पोलीस भवनाच्या कार्यक्रम पत्रिकेत अनिल देशमुखांचं नाव! देशमुख तुरुंगात, मग नाव कशासाठी? चर्चा तर होणारच!

| Updated on: Apr 29, 2022 | 8:13 AM

सन्मानीय उपस्थितीमध्ये एकूण 16 जणांची नावं छापण्यात आली आहेत.

पोलीस भवनाच्या कार्यक्रम पत्रिकेत अनिल देशमुखांचं नाव! देशमुख तुरुंगात, मग नाव कशासाठी? चर्चा तर होणारच!
कार्यक्रम पत्रिका चर्चेत
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नागपूर : नागपूर पोलीस भवनाच्या (Nagpur Police Bhawan Opening) कार्यक्रम पत्रिकेत तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांचं (Anil Deshmukh) नाव छापण्यात आलं. ही कार्यक्रम पत्रिका आता चर्चेचा विषय ठरतेय. कारण अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. तरिही त्यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत छापण्यात आलं असल्याचं चर्चांना उधाण आलंय. आज (29 एप्रिल) रोजी नागपुरात पोलीस (Nagpur Police) भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. दिग्गजांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. मात्र नागपूर पोलिस भवनाच्या या कार्यक्रमाला तुरुंगात असणारे अनिल देशमुख कशी काय हजेरी लावणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 29 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, असं निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आलंय. ‘सन्माननीय उपस्थिती’ मध्ये छापण्यात आलेल्या नावांमध्ये अनिल देशमुखांच्या नावाचाही उल्लेख यावेळी करण्यात आला.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पोलीस भवनाचं उद्घाटन करण्यात येईल. नागपुरात हा सोहळा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई यांचीही नावं या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आली आहे.

सन्माननीय उपस्थितीत अनिल देशमुख..

दुसरीकडे सन्मानीय उपस्थितीमध्ये एकूण 16 जणांची नावं छापण्यात आली. त्यात मान्यवर खासदार आणि आमदारांची नावं देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचाही याच समावेश आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचंही नाव सन्माननीय उपस्थिती असलेल्यांच्या यादीत देण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय.

सध्या न्यायालीन कोठडीत

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआय कोठडीत अनेक दिवस अनिल देशमुख होते. त्यांना आता 16 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांना नागपुरातील कार्यक्रमाला हजेरी कशी लावता येईल, यावरुन आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

फडणवीस नाराज?

नागपुरातील पोलीस मुख्यालय इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमावरून नाराजी नाट्यही पाहायला मिळतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला राहणार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतेय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पत्रिकेत उपस्थितांमध्ये टाकल्यानं भाजप नाराज असल्याचं सांगितलं जातंय. उदघाटक उपमुख्यमंत्री अजित पवार, अध्यक्ष गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांची नावे छापण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव खाली उपस्थितांमध्ये नाव आहे. ‘या इमारतीच्या निर्मितीसाठी 2018 मध्ये मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी 118 कोटी रुपये मंजूर आणि उपलब्ध करून दिले. मात्र, त्यांचं नाव उपस्थितांमध्ये टाकून आघाडी सरकारने आपला द्वेष आणि अपमान केलाय. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारची निंदा भाजपचे प्रदेश प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांनी केलीय.