Arjun Khotkar | खोतकर-सत्तारांनी बॅगा उचलल्या, दिल्लीतला मुक्काम हलला, पाच दिवसांपासून वाटाघाटी, अखेर घोषणा होणार?

| Updated on: Jul 29, 2022 | 1:47 PM

एककिडे शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या खोतकरांवर तपास यंत्रणांचा दबाव आहे तर दुसरीकडे ढासळत्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचं वचन.

Arjun Khotkar | खोतकर-सत्तारांनी बॅगा उचलल्या, दिल्लीतला मुक्काम हलला, पाच दिवसांपासून वाटाघाटी, अखेर घोषणा होणार?
अब्दुल सत्तार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी अखेर दिल्लीतला मुक्काम हलवला. अब्दुल सत्तार यांच्यासोबत अर्जुन खोतकर बॅगा घेऊन दिल्लीतून निघाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात येण्यासाठी दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील जुने वैर मिटवण्याचाही प्रयत्न केला गेला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यामार्फत मध्यस्थी करण्यात आल्याचं बोललं जातंय. आज एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि अर्जुन खोतकर यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अर्जुन खोतकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या बैठकीनंतर अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर बॅगा घेऊन दिल्लीतून निघाले. खोतकर जालन्याला गेल्यानंतरच किंवा सिल्लोड येथील रविवारी होणाऱ्या मेळाव्यात यासंबंधीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

निघताना सत्तार काय म्हणाले?

दिल्लीत अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे गटात मध्यस्थी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. दिल्लीतून निघतानादेखील अब्दुल सत्तारांनी पत्रकारांना अशीच प्रतिक्रिया दिली. मला इथे काहीही काम नव्हतं. मी फक्त अर्जुन खोतकरांना घेऊन जाण्यासाठी आलो होतो, असे सत्तार म्हणाले.

सिल्लोडच्या मेळाव्यात घोषणा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी अब्दुल सत्तारांचा मतदारसंघ सिल्लोडमध्ये शिंदेंच्या नेतृत्वात मोठा दौरा आयोजित करण्यात आला आहे. याच मेळाव्यात अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा करतील, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

खोतकरांच्या मनधरणीसाठी एवढे प्रयत्न का?

मुंबई, ठाण्यानंतर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजतला जातो. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात शिवसेना जास्त रुजलेली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर औरंगाबादमधील पाच आमदार शिंदे गटात गेलेत. हिंगोलीतील एक खासदार, आमदार, उस्मानाबादचे दोन आमदारही शिंदे गटात गेलेत. यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मराठवाड्यातील सत्तेला खिंडार पडलंय. जालन्यात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं प्रस्थ असलं तरीही स्थानिक, ग्रामीण पातळीवर खोतकरांचं वजन आहे. भाजप-शिंदे गटात युती झाली असली तरीही जालन्यात खोतकर आणि दानवेंमध्ये फार जुना वाद आहे. महायुतीच्या निमित्ताने हा वाद मिटावा तसेच मराठवाड्यातून महायुतीला आव्हान देणारं नेतृत्त्वच आपल्याकडे वळवावं, असे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहे. जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक महायुतीसाठी आणखी सोयीची जाईल.

खोतकरांची अडचण काय?

शिवसेनेतील इतर नेत्यांप्रमाणेच भाजप नेते किरीट सोमय्यांनी अर्जुन खोतकरांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची ईडीने चौकशी केली होती. 1984 मध्ये उभारण्यात आलेला जालना सहकारी साखर कारखाना में. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज च्या मालकीचा आहे. कारखान्यात 10 हजार सभासद आहेत. खोतकरांचे निकटवर्तीय जुगलकिशोर तापडिया यांना हा कारखाना विकण्यात आला. त्यासाठी लागणारा पैसा अर्जुन शुगर्सकडून देण्यात आला. याशिवाय या जमिनीच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर थकित कर्ज वसुलीचे कारण सांगत जालना सहकारी साखर कारखान्याचा लिलावही करण्यात आला. ही मालमत्ता 42 कोटी 31 लाखांत विकण्यात आली. ईडीने चौकशी केली असता त्याची किंमत 78 कोटी 38 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली. या सर्व प्रकरणांत खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. एककिडे शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या खोतकरांवर तपास यंत्रणांचा दबाव आहे तर दुसरीकडे ढासळत्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचं वचन. या कैचीत सापडलेले अर्जुन खोतकर सध्या प्रचंड तणावाखाली दिसत आहेत.