मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव

| Updated on: Jun 05, 2019 | 6:39 PM

भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेल्या सपा आणि बसपा यांची युती पाच महिन्यातच तुटली. युती तोडण्याची घोषणा करताना बसपा प्रमुख मायावती यांनी सपावर काही आरोपही केले आहेत.

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या सपा आणि बसपा यांची युती औटघटकेची ठरली. ही युती निवडणुकीपुरतीच आहे, असा दावा भाजपकडून केला जात होता आणि भाजपची भविष्यवाणी अखेर खरी ठरली. बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक इंजिनीअरिंगचा विद्यार्थी म्हणून प्रयोग करुन पाहिला, असं उत्तर त्यांनी दिलंय.

सपाला यादवांची मतं मिळवता आली नाही, अखिलेश यादव यांना त्यांच्या पत्नीलाही जिंकून आणता आलं नाही, असा आरोप मायावती यांनी केला होता. युती तुटल्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असं उत्तर यापूर्वी अखिलेश यादव यांनी दिलं होतं. मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 10 वर्षांपासून बसपाने एकही पोटनिवडणूक लढवलेली नाही. पण यावेळी ही भूमिका बदलली आहे.

मायावती यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पक्षाची बैठक घेतली आणि युतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचं सांगितलं. यादवांची मतं मिळाली नाही. जर ही मतं मिळाली असती तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कुटुंबातलेच लोक हरले नसते. सपाच्या कित्येक लोकांनी युतीविरोधात काम केलं. मुस्लिमांनी आपल्याला पूर्ण साथ दिली, असं मायावती म्हणाल्या.

उत्तर प्रदेशातील अनेक आमदार खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दोन्ही सभागृहांसाठी निवड झाल्यानंतर एक जागा रिक्त करणं अनिवार्य आहे. रिक्त जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक आमदार हे खासदार झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे.

रामपूर सदर, जलालपूर, बलहा, जैदपूर, माणिकपूर, गंगोह, प्रतापगड, गोविंद नगर, लखनौ कँट, टुडला, इगलास, हमीरपूर या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत इथे भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सपा आणि बसपाचं आव्हान असेल असा अंदाज लावला जात होता. पण भाजपने सर्व अंदाज खोटे ठरवत दणदणीत यश मिळवलं. तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा मात्र कमी झाल्या आहेत. यावेळी भाजपने 62, सपा-बसपा 15, काँग्रेस 01 आणि अपना दलने 02 जागा जिंकल्या आहेत.