भाजप आमदाराच्या मुलीचं पळून जाऊन लग्न, व्हिडीओद्वारे बापाला धमकी

यासाठी साक्षीने एक व्हिडीओ पाठवून वडिलांनाही धमकीवजा इशारा दिला आहे. मी स्वतः जीव गमावला तरी कुणाला सोडणार नाही, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. शिवाय आमच्या मागे पाठवलेले गुंड परत बोलवा, असंही तिने म्हटलंय.

भाजप आमदाराच्या मुलीचं पळून जाऊन लग्न, व्हिडीओद्वारे बापाला धमकी
| Edited By: | Updated on: Jul 11, 2019 | 7:50 PM

लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेलीचे भाजप आमदार राजेश मिश्रा यांच्या मुलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 23 वर्षीय साक्षी मिश्राने 29 वर्षीय अजितेश कुमार नावाच्या मुलासोबत लग्न केलंय. पण कुटुंबीयांकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप तिने केलाय. यासाठी तिने एक व्हिडीओ पाठवून वडिलांनाही धमकीवजा इशारा दिला आहे. मी स्वतः जीव गमावला तरी कुणाला सोडणार नाही, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. शिवाय आमच्या मागे पाठवलेले गुंड परत बोलवा, असंही तिने म्हटलंय.

जीवाला धोका असल्याचा आरोप करत साक्षी मिश्राने अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. 15 जुलैला यावर सुनावणी होणार आहे. भाऊ, वडील आणि इतर नातेवाईकांकडून आमच्या जीवाला धोका असल्याचा आरोप साक्षी मिश्राने केलाय. माझ्या वडिलांना साथ देत असलेले स्थानिक खासदार, मंत्री आणि आमदारांनी त्यांचे विचार बदलावे आणि आमचं नातं स्वीकारावं, असं आवाहन साक्षीने या व्हिडीओद्वारे केलंय.

वडिलांनी पाठवलेल्या गुंडांच्या हाती लागले तर आम्हा दोघांनाही जीवे मारलं जाईल, अशी भीती आमदाराच्या मुलीने व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी पोलीस संरक्षणही मागितलंय. साक्षीने विवाह केलेला तरुण अनुसूचित जातीचा असल्यामुळे विरोध होत असल्याचं बोललं जातंय.

भाजप आमदार राजेश मिश्रा यांनीही मुलीने केलेल्या आरोपांवर उत्तर दिलंय. दलित तरुणासोबत लग्न करण्याला विरोध नाही, पण तिच्या भविष्याची चिंता आहे. संबंधित मुलगा साक्षीपेक्षा नऊ वर्षांनी मोठा असून त्याच्या कमाईचाही काही स्रोत नाही. एक वडील म्हणून मुलीची चिंता वाटते. मुलीला त्रास देण्याबाबत स्वप्नातही विचार करु शकत नाही. दोघांनीही परत यावं, असं आवाहन राजेश मिश्रा यांनी केलंय.