MNS-BJP | मुंबईतील ‘ही’ जागा भाजपा मनसेला सोडणार का? ठाकरे गटाच्या हक्काच्या मतांना खिंडार पाडण्याची खेळी

MNS-BJP | मनसे अजून महायुतीचा भाग नाहीय. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबईतील एक जागा भाजपा मनसेला सोडू शकते. तसा विचार वरिष्ठ पातळीवर सुरु झाला आहे. असा राजकीय समझोता झाल्यास महायुतीचा भरपूर फायदा आहे.

MNS-BJP | मुंबईतील ही जागा भाजपा मनसेला सोडणार का? ठाकरे गटाच्या हक्काच्या मतांना खिंडार पाडण्याची खेळी
devendra fadnavis and raj thackeray
| Updated on: Mar 14, 2024 | 11:25 AM

Loksabha Election 2024 (विनायक डावरुंग) | आगामी लोकसभेची निवडणूक मनसे लढवणार की, नाही या बद्दल अजूनही संभ्रम आहे. मागच्या काही महिन्यांपासून मनसेच्या विभाग, जिल्हानिहाय बैठका सुरु आहेत. येत्या तीन-चार दिवसात मी लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करेन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. जनाधार, कार्यकर्ते, आर्थिक ताकद यांचा विचार केल्यास मनसेच्या कुठल्याही उमेदवाराच्या विजयाची खात्री देता येत नाही. विद्यमान राजकीय परिस्थितीत मनसेची कुठल्याही पक्षासोबत युती झालेली नाही. शिवसेना शिंदे गट आणि भाजपा बरोबर मनसेची युती होईल, अशी चर्चा होती. पण तसं काही घडलं नाही. मनसेच्या काही कार्यक्रमांना स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले. पण प्रत्यक्षात राजकीय युती झाली नाही. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजपा दक्षिण मुंबईची जागा सोडू शकते अशी चर्चा आहे. प्राथमिक स्तरावर बोलणी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

दक्षिण मुंबई हा मराठी बहुल भाग आहे. परळ, लालबाग, काळाचौकी, वरळी, गिरगाव आणि शिवडी हा भाग या मतदारसंघामध्ये येतो. दक्षिण मुंबईचा पुढचा खासदार निवडण्यात मराठी मत निर्णायक ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या गटाची ताकद इथे जास्त आहे. भाजपाचेही दोन आमदार या मतदारसंघात आहेत. त्यामुळे राजकीय ताकदीचा विचार करता ही जागा भाजपाकडे येऊ शकते. दक्षिण मुंबईतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लोकसभेच तिकीट मिळणार अशी चर्चा आहे. त्यांचे बॅनरही मतदारसंघात लागले आहेत. पण प्रत्यक्ष तळागाळात जनसंपर्क नाहीय.

इथे उद्धव ठाकरे गटाच पारड जड

अशावेळी उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच पारड जड मानल जातय. मागचे दोन टर्म ते दक्षिण मुंबईतून खासदार आहेत. आता मविआकडून ही जागा ठाकरे गटाला सोडली जाईल, पुन्हा तिकीट अरविंद सावंत यांनाच मिळणार. दोन टर्म खासदार राहिल्यामुळे अरविंद सावंत यांचा जनसंपर्क आहे, तिच बाब त्यांच्या पथ्यावर पडू शकते. अशावेळी मनसेला दक्षिण मुंबईची जागा सोडल्यास मराठी बहुल भागातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला होणार एकगठ्ठा मतदान रोखता येऊ शकतं. कारण दक्षिण मुंबईत मनसेची ताकद आहे.

मनसेला जागा देण्यात भाजपाचा फायदा काय?

भले मनसेचा आमदार, नगरसेवक नसला, तरी त्यांना मानणारा एकनिष्ठ मतदार आहे. अशावेळी निवडणूक अटीतटीची करण्यापेक्षा मनसेला जागा सोडल्यास विजयाची शक्यता जास्त वाढेल. शिवाय राज ठाकरे सोबत आल्यामुळे प्रचाराला अजून धार येईल.