हे फक्त भाजपातच होऊ शकतं, अनपेक्षितपणे तिकीट मिळालेल्या तरुणाची भावूक प्रतिक्रिया

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : लोकसभेचं तिकीट न मिळालेल्या नाराजांची यादी तयार करायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. पण काही अशीही उदाहरणं आहेत, ज्यांना आश्चर्यकारकरित्या तिकीट मिळालंय. भाजपचा 28 वर्षीय युवा नेता तेजस्वी सूर्या हे असंच उदाहरण आहे. पक्षाने तिकीट जाहीर केल्यानंतर त्याला स्वतःला विश्वास बसला नाही. उत्कृष्ट वक्ता म्हणून ओळख असलेल्या सूर्याला बंगळुरुतून उमेदवारी देण्यात आली […]

हे फक्त भाजपातच होऊ शकतं, अनपेक्षितपणे तिकीट मिळालेल्या तरुणाची भावूक प्रतिक्रिया
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभेचं तिकीट न मिळालेल्या नाराजांची यादी तयार करायचं म्हटलं तर वेळ पुरणार नाही. पण काही अशीही उदाहरणं आहेत, ज्यांना आश्चर्यकारकरित्या तिकीट मिळालंय. भाजपचा 28 वर्षीय युवा नेता तेजस्वी सूर्या हे असंच उदाहरण आहे. पक्षाने तिकीट जाहीर केल्यानंतर त्याला स्वतःला विश्वास बसला नाही. उत्कृष्ट वक्ता म्हणून ओळख असलेल्या सूर्याला बंगळुरुतून उमेदवारी देण्यात आली आहे. दिवंगत भाजप नेते अनंत कुमार यांचा हा बालेकिल्ला होता. त्यांच्या जागी पत्नीला संधी देण्यात येईल असा अंदाज असतानाच भाजपने सर्वांना धक्का दिला.

पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सूर्याला विश्वास बसला नाही. ट्वीट करुन तो म्हणाला, “मला यावर विश्वास बसत नाहीये. देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान आणि सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी या 28 वर्षीय युवकावर विश्वास ठेवलाय. बंगळुरु दक्षिण सारख्या प्रतिष्ठित मतदारसंघाची जबाबदारी देण्यासाठी पात्र समजलं. हे फक्त भाजपातच होऊ शकतं”.

तेजस्वी सूर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. मी भावूक झालोय. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. मी वचन देतो, की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीसाठी काम करत राहिल. कृतज्ञतेचे उपकार फेडण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असंही तेजस्वी सूर्या म्हणाला.

तेजस्वी सूर्याला पक्षाने संधी दिली असली तरी त्याचा पुढचा प्रवास सोपा नसेल. कारण, अनंत कुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी आपल्याला डावलल्याचा आरोप केलाय. अनंत कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपविरोधातच नाराजी जाहीर केली. तर तेजस्विनी यांनी पक्षाच्या निर्णयाचा आदर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे तेजस्वी सूर्याला पक्षातून आव्हान निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेजस्विनी यांना डावलल्यामुळे पक्षात नाराजी असली तरी सूर्याच्या पात्रतेवर कुणालाही शंका नाही. तेजस्वी सूर्या कर्नाटक भाजपच्या युवा मोर्चाचा सचिव आणि राज्यातील तरुण चेहरा म्हणून परिचित आहे. व्यवसायाने वकील असलेल्या सूर्याने बंगळुरु इंस्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीजमधून शिक्षण पूर्ण केलंय. त्याच्या आक्रमक भाषणांसाठी तो ओळखला जातो.