महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ, पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात विजयाचा गुलाल, भाजपचा दारुण पराभव!

| Updated on: Dec 04, 2020 | 9:11 AM

'विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच', असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ, पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात विजयाचा गुलाल, भाजपचा दारुण पराभव!
Follow us on

मुंबई: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसलाय. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. (BJP defeats graduate and teacher constituency elections)

पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे. ‘विधान परिषदेच्या 6 जागाही आम्ही जिंकू आणि पुणे तर वनवेच’, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी विजयी गुलाल लावला आहे. अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 2 वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे पुण्यात भाजपचाच विजय होणार, असा दावा पाटील यांनी केला होता. पुण्याची जागा वनवे येईल, असा विश्वास त्यांना होता. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकजुटीपुढं भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कुणाला किती मतं?

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांना 1लाख 22 हजार 145 मतं
  • भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतं
  • अरुण लाड यांचा संग्राम देशमुखांवर तब्बल 48 हजार 824 मतांनी विजय

नागपूर पदवीधर मतदारसंघ

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसलाय. महाविकास आघाडी पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारी यांनी भाजप उमेदवार संदीप जोशी यांना मोठ्या फरकानं मागे टाकलं आहे. मात्र, मतांचा कोटा पूर्ण झाला नसल्या कारणाने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना विजय जवळपास निश्चित आहे. फक्त ते किती मताधिक्य मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(BJP defeats graduate and teacher constituency elections, Mahavikas Aghadi wins)

कुणाला किती मतं?

  • पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अजित वंजारी यांना 55 हजार 947 मतं
  • भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41 हजार 540 मतं
  • दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयी हॅटट्रिक साधली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरिष बोराळकर यांचा सलग दुसऱ्यांना पराभव केला आहे. मतांची वाढलेली टक्केवारी पाहता सतीश चव्हाण यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसा दावा भाजपकडूनही करण्यात आला होता. पण वाढलेली बहुतांश मतं ही सतीश चव्हाण यांच्याच पारड्यात पडल्याचं निकालावरुन पाहायला मिळत आहे. सतीश चव्हाण यांनी यापूर्वी सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यावेळीही त्यांनी भाजप उमेदवारावर मात करत विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

कुणाला किती मतं?

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना तब्बल 1 लाख 16 हजार 638 मतं
  • भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मतं
  • सतीश चव्हाण यांचा बोराळकरांवर तब्बल 57 हजार 895 मतांनी विजय

अमरावती शिक्षक मतदारसंघ

अमरावती शिक्षक मतदारसंघातही भाजपला आणि सोबतच शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांनाही मोठा धक्का बसताना पाहायला दिसतोय. कारण पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सरनाईक यांना 6 हजार 528 मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 5 हजार 447 मतं मिळाली आहेत. शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांनाही 5 हजार 205 मतं मिळाली आहेत. मात्र, एकाही उमेदवाराने मतांचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजप नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या भगिनी अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांनाही पहिला पसंतीच्या मतांमध्ये भाजप उमेदवारापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघ

पुणे शिक्षक मतदारसंघातही भाजपला मोठा धक्का बसलाय. एलिमिनेशनच्या एकोणिसाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना 17 हजार 117 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 167 मतं मिळाली आहेत. भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांना अवघ्या 5 हजार 578 मतांवर समाधान मानावं लागलं आहेत. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात विजयी मतांचा कोटा अद्याप पूर्ण झाला नसल्याने एलिमिनेशनच्या सर्व फेऱ्या पूर्ण करुन, सर्वाधिक मतं घेणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जाईल. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवाचा विजय निश्चित मानला जात आहे.

धुळे-नंदुरबारमध्ये भाजपला दिलासा

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी काँग्रेस उमेदवार अभिजित पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. अमरीश पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपाच्या 199 मतदारांनी तर महाविकास आघाडीच्या 213 मतदारांनी मतदान केलं होते. त्यात काँग्रेसच्या किमान 57 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही अभिजित पाटील यांना फक्त 98 मतं मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. महाविकास आघाडीकडे 213 मतं असतानाही पाटील यांना 98 च मतं मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संबंधित बातम्या:

भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड? नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयाच्या उंबरठ्यावर

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक, बोराळकर पराभूत

BJP defeats graduate and teacher constituency elections, Mahavikas Aghadi wins