शिवसेना-भाजप युती होणार का? वाघ आणि सामंत यांचं एकमेकांकडे स्मितहास्य

| Updated on: Jun 22, 2021 | 3:20 PM

Chitra Wagh Uday Samant | वैयक्तिक चर्चा झाल्यानंतर चित्रा वाघ आणि उदय सामंत प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला.

शिवसेना-भाजप युती होणार का? वाघ आणि सामंत यांचं एकमेकांकडे स्मितहास्य
उदय सामंत आणि चित्रा वाघ
Follow us on

सिंधुदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा भाजपशी युती करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. त्यामुळे शिवसेना-भाजप मनोमीलनाच्या चर्चा नव्याने रंगू लागल्या आहेत. अशातच मंगळवारी सिंधुदुर्गातील एका प्रसंगाने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (BJP leader Chitra Wagh meet with Shivsena minister Uday Samant)

संजय राठोड प्रकरणात शिवसेनेला जेरीस आणणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या सध्या सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर राज्याचे उच्च आणि तंञशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची भेट घेतली. यावेळी त्याठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हेदेखील उपस्थित होते.  वैयक्तिक चर्चा झाल्यानंतर चित्रा वाघ आणि उदय सामंत प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना, शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बघत केवळ स्मितहास्य केले. त्यांच्या या मौनाचा नेमका अर्थ काय, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मात्र, उदय सामंत यांनी चित्रा वाघ यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा केला आहे. प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. नेत्यांनी एकमेकांना भेटणे ही राजकीय संस्कृती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.

उदय सामंत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला

गेल्याच महिन्यात तौक्ते चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी कोकणात आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांची रत्नागिरीत भेट झाली होती. या भेटीत बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर उदय सामंत हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठीही गेले होते. त्याच्या दोन दिवस आधीच देवेंद्र फडणवीस हेदेखील शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात भेटीगाठींच्या या टायमिंगची चर्चा रंगली होती.

2024मध्ये युती होणार का?, विनायक राऊतांचं मौन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपशी जुळवून घ्या, असं केलेलं आवाहन यामुळे शिवसेना नेते बॅकफूटवर आलेले दिसत आहेत. 2024 मध्ये शिवसेना-भाजपची युती होणार का?, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांना केला असता त्यांनी सोयीस्कर मौन पाळलं. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांवरही टीका केली. तसेच प्रताप सरनाईक यांची बाजूही घेतली. पण 2024मध्ये शिवसेना-भाजपची युती होणार का? असा सवाल करताच त्यांनी मौन पाळलं. त्यांनी या प्रश्नाला हो ही म्हटलं नाही आणि ना ही म्हटलं नाही. फक्त महाविकास आघाडी पाच वर्षे चालणार, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं राऊत म्हणाले. मात्र, युती होणार का या प्रश्नाचं उत्तर देणं सोयीस्कर टाळलं. त्यामुळे राऊत यांच्या या मौनाचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

संबंधित बातम्या:

“14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी सरकारला भीती”

सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

(BJP leader Chitra Wagh meet with Shivsena minister Uday Samant)