सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोण कुणावर नाराज आहे, याचं आम्हाला काही घेणं नाही. पण सत्तेत येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. (Devendra Fadnavis)

सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis

मुंबई: राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोण कुणावर नाराज आहे, याचं आम्हाला काही घेणं नाही. पण सत्तेत येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही अल्टरनेट देऊ, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीस यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (MVA govt will collapse on its own: Devendra Fadnavis)

राज्याचं अधिवेशन घेण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. सत्तेत येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. देशाच्या 70-72 वर्षाच्या इतिहासात असली सरकारे चालताना दिसली नाही. पण आम्ही सरकार पाडणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने हे सरकार पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र, जोपर्यंत विरोधी पक्षात आहोत, तोपर्यंत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी सक्षमपणे पार पाडू, असं त्यांनी सांगितलं.

जनतेला का भरडता?

यावेळी त्यांनी आघाडीतील तिन्ही पक्षातील विसंवादावर भाष्यही केलं. तीन पक्षात विसंवाद आहे, त्यांच्यात एकमेकांवर विश्वास राहिला नाही, हे सर्वांना माहीत आहे. पण तुमच्या भानगडीत जनतेला का भरडता? सा सवाल करतानाच तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, एकमेकांच्या गळ्यात गळे घाला. पण जनतेला त्रास का देता? असा सवाल त्यांनी केला.

तीन पक्षांची नौटंकी

मुख्यमंत्री आघाडीतील मित्रपक्षांवर नाराज आहेत की नाही मला माहीत नाही. पण जनता सरकारवर नाराज आहे. ही तीन पक्षांची नौटंकी आहे. पदोन्नतीतील आरक्षणावर काँग्रेसने तलवारी उपसल्या होत्या. त्याचा जीआरही निघाला, सर्व काही झालं. काँग्रेसने तलवारी म्या केल्या असून गप्प बसले आहेत. केवळ दाखवण्यासाठी काँग्रेस भांडत असते, सत्तेचा मलिदा खाण्यासाठीच आघाडीतील नेते भांडणाचा दिखावा करून दिशाभूल करत आहेत, असा दावा त्यांनी केला.

येणार तर मोदी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली आहे. त्यावर फडणवीसांनी भाष्य केलं. कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणी कितीही मोट बांधली तरी लोकांच्या मनात मोदीच आहेत. 2024मध्ये मोदीच येणार आहेत. 2019मध्ये असाच मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. या पेक्षा अधिक पक्ष एकत्रं आले होते. पश्चिम बंगालमध्ये या नेत्यांनी हातात हात घालून फोटोही दिले होते. त्याचाही काही परिणाम झाला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. (MVA govt will collapse on its own: Devendra Fadnavis)

 

संबंधित बातम्या:

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? आक्रमक फडणवीस बैठकीतून बाहेर

नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली

2024मध्ये युती होणार का?, विनायक राऊतांचं मौन; चर्चांना उधाण

(MVA govt will collapse on its own: Devendra Fadnavis)

Published On - 1:57 pm, Tue, 22 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI