बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही; खडसेंच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण

| Updated on: Dec 03, 2020 | 4:09 PM

या घोटाळ्यात माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. | Girish Mahajan

बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही; खडसेंच्या इशाऱ्यानंतर गिरीश महाजनांचे स्पष्टीकरण
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटीचा घोटाळा उघड करण्याचा इशारा दिल्यानंतर आता भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. जळगावातील एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे कट्टर विरोधक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे. त्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. (BJP leader Girish Mahajan denied all accusations in BHR scam)

या घोटाळ्यात माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. कोणाच्या पतसंस्थेत घोटाळा झाला, याचीही चौकशी व्हावी. मात्र, माझ्यावर केवळ राजकीय कारणासाठी आरोप होत आहेत. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रापेक्षा राष्ट्रीय राजकारणात रस असल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्याविषयीही विचारणा करण्यात आली. त्यावर गिरीश महाजन यांनी फार बोलणे टाळले. कोणाला काय पद द्यावं, हा पवार कुटुंबीयांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे. याप्रकरणात मोठी गँग अडकली आहे, असा गौप्यस्फोट करतानाच ईडीने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली होती.

काय आहे बीएचआर प्रकरण?

बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर 2017 साली खडसे यांनी त्याविरोधात तक्रार केली होती. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षा खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावेळी राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप खडसेंनी केला होता. त्यानंतर खडसे यांनी आता पुन्हा या प्रकरणाला हात घातला असून अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.

संबंधित बातम्या:

बीएचआर बँक घोटाळ्याची व्याप्ती अकराशे कोटींची, बड्या मंडळींनी मालमत्ता विकत घेतल्या, एकनाथ खडसेंचा आरोप

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

(BJP leader Girish Mahajan denied all accusations in BHR scam)