कार अपघातावरुन मुलावर गंभीर आरोप, आमदार परिणय फुकेंची रात्री उशीरा पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मुलगा…

Pench tiger reserve accident : पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या अपघातानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघातग्रस्त वाहनात आपला मुलगा नव्हता, तर तो दुसऱ्या गाडीत होता, असा खुलासा फुके यांनी केला आहे. या अपघातात मृत्यू झालेला तरुणही आपल्या मुलासारखाच होता आणि त्याच्या कुटुंबीयांशी आपले स्नेहाचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कार अपघातावरुन मुलावर गंभीर आरोप, आमदार परिणय फुकेंची रात्री उशीरा पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मुलगा...
आमदार परिणय फुकेंचा अपघात प्रकणावर मोठा खुलासा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 10:10 PM

पेंच अभयारण्य परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि काही विरोधी पक्ष नेत्यांकडून माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल करण्यात आलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहेत. अपघातग्रस्त वाहनात माझा मुलगा नव्हता. तो दुसऱ्या गाडीत होता. या अपघातात ज्या तरुणाचे निधन झाले तो सुद्धा माझ्या मुलासारखाच होता. त्याच्या कुटुंबीयांशी आमचे स्नेहाचे नाते आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्युने आमचे कुटुंब सुद्धा दुःखात आहे. आम्ही अजूनही सावरलेलो नाही, अशी पहिली प्रतिक्रिया भाजप आमदार परिणय फुके यांनी संबंधित प्रकरणानंतर दिली आहे. त्यांनी एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

पुढे बोलताना त्यांनी लिहिलं की परंतु, या घटनेसंबंधी कोणतीही ठोस माहिती किंवा तपासातून निष्पन्न झालेली वस्तुस्थिती समोर येण्यापूर्वीच अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. यातून माझी आणि माझ्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेच्या अनुषंगाने काँग्रेस आणि काही विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आलेले आरोप आणि त्यातून निर्माण केले जाणारे राजकीय वातावरण योग्य नाही. अपघात नेमका कसा घडला, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे, हे पोलिसांच्या निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होईल.

Loading...

 

 

या दुर्दैवी घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे काँग्रेसने टाळायला हवे होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सत्य आणि न्याय महत्त्वाचा आहे. माझा कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला किंवा अपप्रचाराला बळी न पडता निष्पक्ष चौकशी होऊ द्यावी. सत्य समोर येईलच, असं आमदार परिणय फुके यांनी शेवटी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

काय आहे सर्व प्रकरण?

नागपुरजवळील पेंच अभयारण्य परिसरामध्ये भीषण अपघात झाला. कारच्या या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातली कार ही भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. एवढच नाही तर ही अपघातग्रस्त कार त्यांचा मुलगा यथार्थ हा चालवत होता, असंही त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हे प्रकरण सत्तेच्या दबावाखाली दाबले जात असल्याचा आरोप केला.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us