बिल्डर, भाजपचा नगराध्यक्ष ते खासदार, कोण आहेत सुनील मेंढे?

| Updated on: Sep 12, 2021 | 7:10 AM

MP Sunil Mendhe | सुनील मेंढे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. नंतरच्या काळात त्यांनी भाजपमधून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य होते.

बिल्डर, भाजपचा नगराध्यक्ष ते खासदार, कोण आहेत सुनील मेंढे?
सुनील मेंढे, भाजप खासदार
Follow us on

मुंबई: भाजपमध्ये अल्पावधीत झपाट्याने प्रगती करणाऱ्या नेत्यांमध्ये खासदार सुनील मेंढे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या सुनील मेंढे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांचा पराभव करत भंडारा-गोंदिया मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मर्जीतील नेता म्हणूनही सुनील मेंढे ओळखले जातात. आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत सुनील मेंढे यांनी बिल्डरपासून ते खासदार पदापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. (Political journey of BJP Bhandara Gondiya loksabha constituency MP MP Sunil Mendhe)

कोण आहेत सुनील मेंढे?

सुनील मेंढे यांचा जन्म 14 एप्रिल 1968 रोजी पवनी तालुक्यातील आसगाव येथे झाला. उच्च माध्यमिक शिक्षणानंत सुनील मेंढे यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले. यासाठी त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंगची पदविका घेतली होती. यानंतर अल्पावधीतच त्यांनी भंडारा जिल्ह्यातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण केली. सुनील मेंढे मितभाषी असले तरी लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

सुनील मेंढे यांचा राजकीय प्रवास?

सुनील मेंढे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. नंतरच्या काळात त्यांनी भाजपमधून राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य होते. त्यानंतर सुनील मेंढे यांनी भंडाऱ्याच्या नगराध्यक्षपदी विक्रमी मताधिक्याने निवडून येत आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्या. सुनील मेंढे यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात जिल्ह्यातील अनेक विकासकामे मार्गी लागली. त्यामुळेच सुनील मेंढे यांनी अल्पावधीतच कार्यक्षम नेता म्हणून ओळख निर्माण केली.

याच कामगिरीच्या जोरावर भाजपने सुनील मेंढे यांना 2019 मध्ये लोकसभेचे तिकीट देऊ केली. मात्र, भंडारा-गोंदिया हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने याठिकाणी सुनील मेंढे यांची डाळ कितपत शिजेल, अशा शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आणि अचूक राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांचा तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव केला.

लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी मोडून सलूनमध्ये

गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनच्या काळात सुनील मेंढे यांनी कोरोना निर्बंधांना फाटा दिल्यामुळे ते चर्चेत आले होते. लॉकडाऊन असतानाही सुनील मेंढे यांनी सलून चालकाला दुकान उघडायला लावले होते. सलूनमध्ये त्यांचे केस कापत असताना काही लोकांनी त्यांचा व्हीडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वादावर पडदा टाकण्यासाठी सुनील मेंढे यांनी तेथून काढता पाय घेतला होता.

(Political journey of BJP Bhandara Gondiya loksabha constituency MP MP Sunil Mendhe)