पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही घेतही नाही : गिरीश बापट

पार्थ पवार यांनी 'जय श्रीराम'चा नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, 'जय श्रीराम' एकटा पार्थ थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असंही बापट म्हणाले.

पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही घेतही नाही : गिरीश बापट
| Updated on: Aug 16, 2020 | 7:15 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगली होती. पार्थ पवार भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी चर्चा फेटाळून लावल्या आहेत. (BJP Pune MP Girish Bapat on Parth Pawar)

“पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही. त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे हा घरातला. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा” असे गिरीश बापट म्हणाले. पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, ‘जय श्रीराम’ एकटा पार्थ थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असंही बापट म्हणाले.

शरद पवार सपत्नीक पुण्यात

शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार सकाळी मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाहून पुण्याला आले होते. त्यानंतर बारामतीत पवार कुटुंबाची एकत्रित चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र संभाव्य दौरा रद्द करत संध्याकाळी पवार दाम्पत्य पुण्याहून पुन्हा मुंबईला परतले.

हेही वाचा : शरद पवार सपत्नीक पुण्यात, अजित पवारही बारामती दौऱ्यावर, पवार कुटुंबाची चर्चा होणार?

दुसरीकडे, अजित पवार यांच्यापाठोपाठ पार्थ पवार संध्याकाळी बारामतीहून पुण्याकडे रवाना झाले. पुण्यातून ते मुंबईला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी काल झालेल्या बैठकीनंतर पार्थ पवार बारामतीतच मुक्कामी होते.

शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर कुटुंबात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांची भूमिका काय आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी पार्थविषयी बोलण्यास नकार दिला. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं बोलून ते निघून गेले.