‘हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान व्हावी’ औवेसींच्या इच्छेवर भाजप काय म्हणालं? वाचा

हिजाब वादाचा मुद्दा जिथून सुरु झाला होता, त्या कर्नाटक राज्यातून औवेसींनी केलेलं वक्तव चर्चेत! भाजपचीही प्रतिक्रिया समोर

हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान व्हावी औवेसींच्या इच्छेवर भाजप काय म्हणालं? वाचा
भाजप औवेसींना काय म्हणालं?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 26, 2022 | 4:40 PM

कर्नाटक : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मंगळवारी कर्नाटकात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान (Prime Minister of India) पदावरुन एक महत्त्वाचं विधान केलं. येत्या काळात एक दिवस हिजाब (Hijab Row) घातलेली एखादी मुलगी देशाची पंतप्रधान व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असं औवेसी यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे देशात हिजाब घालण्यावरुन बराच वाद झालेल्याच पाहायला मिळालं होतं. दरम्यान, ज्या राज्यातून या वादाला सुरुवात झाली होती, त्या कर्नाटकमध्येच असदुद्दीन औवेसी यांनी हे विधान केलं आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबाबत पत्रकारांनी औवेसी यांनी प्रश्न केला होता. त्यावर बोलताना औवेसी यांनी म्हटलं की, मला भारताच्या पंतप्रधान पदी हिजाब घातलेली मुलगी विराजमान झाल्याचं पाहायचं आहे. यावेळी औवेसी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, औवेसी यांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपचे शहजाद पुनावाला यांनी औवेसी यांना प्रतिप्रश्न केला आहे. भारताचं पंतप्रधानपद सोडा आणि एमआयएमच्या अध्यक्षपदी आम्हाला हिजाब घातलेली मुलगी कधी पाहायला मिळेल, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. शिवाय याची सुरुवात औवेसींनी स्वतःच्या पक्षापासूनच करावी, असंही ते म्हणालेत.

सध्या कर्नाटकातील हिजाब वाद हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. दोन न्यायाधीशांनी नोंदवलेल्या वेगवेगळ्या मतांमुळे एका खंडपीठापुढे आता हिजाब वादाची सुनावणी पार पडणार आहे. त्याआधी आता पुन्हा हिजाबचा वाद चर्चेत आलाय.