BMC Election : ठाकरे बंधूंची डोकेदुखी वाढली; किती जणांनी केली बंडखोरी? पाहा नावासह संपूर्ण यादी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची १८ वर्षांनंतर युती झाली असली, तरी मुंबईतील ८ प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे.

महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधूंची युती झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली. यानंतर ठाकरे बंधूंनी जागावाटपाचे सूत्र ठरवत ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले. मात्र आता युतीला बंडखोरीचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे.
मनसे आणि ठाकरे गटाच्या जागावाटपाच्या सूत्रानंतर मुंबईतील तब्बल ८ प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. यामध्ये शिवसेना (UBT) गटाचे ७, तर मनसेचा १ बंडखोर उमेदवार रिंगणात उतरला आहे. त्यामुळे युतीसमोर पेच निर्माण झाला आहे.
कोण अधिकृत उमेदवार
मुंबईतील प्रभाग क्रमांक १०६ मध्ये युतीकडून मनसेचे सत्यवान दळवी यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र तेथे शिवसेना ठाकरे गटाचे सागर देवरे यांनी बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ११४ मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या राजोल पाटील यांच्याविरुद्ध मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी बंड पुकारले आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांना प्रभाग क्रमांक २०२ मधून अधिकृत उमेदवारी मिळाली असली, तरी त्यांच्यासमोर स्वपक्षीय विजय इंदुलकर यांचेच आव्हान उभे ठाकले आहे.
| प्रभाग | अधिकृत उमेदवार (पक्ष) | बंडखोर उमेदवार (पक्ष) |
| ९५ | हरी शास्त्री (शिवसेना ठाकरे गट) | चंद्रशेखर वायंगणकर (शिवसेना ठाकरे गट) |
| १०६ | सत्यवान दळवी (मनसे) | सागर देवरे (शिवसेना ठाकरे गट) |
| ११४ | राजोल पाटील (शिवसेना ठाकरे गट) | अनिशा माजगावकर (मनसे) |
| १६९ | प्रवीणा मोरजकर (शिवसेना ठाकरे गट) | कमलाकर नाईक (शिवसेना ठाकरे गट) |
| १९३ | हेमांगी वरळीकर (शिवसेना ठाकरे गट) | सूर्यकांत कोळी (शिवसेना ठाकरे गट) |
| १९६ | पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे गट) | संगीता जगताप (शिवसेना ठाकरे गट) |
| २०२ | श्रद्धा जाधव (शिवसेना ठाकरे गट) | विजय इंदुलकर (शिवसेना ठाकरे गट) |
| २०३ | भारती पेडणेकर (शिवसेना ठाकरे गट) | दिव्या बडवे (शिवसेना ठाकरे गट) |
वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू
दरम्यान ही बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी कार्यकर्त्यांमधील नाराजी शमलेली नाही. ठाकरे ब्रँड एकत्र आल्याने मतविभाजन टाळण्याचे उद्दिष्ट होते. मात्र आता या ८ प्रभागांमधील अंतर्गत कलहाचा फायदा महायुती किंवा इतर विरोधकांना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या बंडखोरांवर पक्षप्रमुख कारवाई करणार की या जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
