भाजप-शिवसेनेत फॉर्म्युला ठरताना 22 ते 25 जागांची अदलाबदल : सूत्र

| Updated on: Sep 10, 2019 | 1:27 PM

भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) जागावाटपांची चर्चा सुरू आहे. यात ठरणाऱ्या युतीच्या फॉर्म्युलामध्ये जवळपास 22 ते 25 जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

भाजप-शिवसेनेत फॉर्म्युला ठरताना 22 ते 25 जागांची अदलाबदल : सूत्र
Follow us on

मुंबई : भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) जागावाटपांची चर्चा सुरू आहे. यात ठरणाऱ्या युतीच्या फॉर्म्युलामध्ये जवळपास 22 ते 25 जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) जे विद्यमान आमदार भाजप-शिवसेनेमध्ये आले आहेत, त्यांच्या जागांबाबत ही अदलाबदल होईल.

काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. हे पाहाता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचं सूत्र बदलणार हे निश्चित मानलं जात आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार काही ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. या जागा घेण्यासाठी भाजप उत्सूक असल्याचंही सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे भाजप-शिवसेनेत जागा वाटपाचा फार्म्युला ठरवताना काही पारंपरिक जागांचीही अदलाबदल होणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्याने त्यांचा काही पारंपारिक जागांवर पराभव झाला होता. यात दोन्ही पक्षांच्या काही ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. अदलाबदल होणाऱ्या जागांमध्ये मुंबईच्या 4 ते 5 जागांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अंतिम जागावाटपांचं सूत्र काय ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

अदलाबदल होणाऱ्या संभाव्य जागा

कोळंबकर भाजपमध्ये गेल्याने शिवसेनेला हा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात सोडावा लागणार आहे. त्याजागेवर शिवसेना  भाजपचा मुंबईतील इतर दुसरा मतदारसंघ घेऊ शकते. शिवसेनेकडून वडाळ्याऐवजी गोरेगाव मतदारसंघाची मागणी होण्याची शक्यता अधिक आहे. गोरेगावमध्ये विद्या ठाकूर या भाजप आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या सुभाष देसाई यांचा पराभव केला होता.

सिलोड विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहे. मात्र, या मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनच्या वाट्याला येणार आहे. दुसरीकडे उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करताना भाजपकडून या जागांची मागणी होईल.  त्यामुळे भाजप-शिवसेनेत या सर्व जागांची अदलाबदल निश्चित मानली जात आहे.