‘अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण टिकवता येत नाही’, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

| Updated on: Jun 05, 2021 | 6:55 PM

'पहाटेच्या सरकार'वरुन चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच

अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण टिकवता येत नाही, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाक् युद्ध सुरुच आहे. ‘पहाटेच्या सरकार’वरुन आता या दोन दादांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार झोपेत असतानाच पडेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी ‘मी रोज रात्री झोपेतून उठून पाहतो की, सरकार पडलं की काय?’ असा टोला लगावला आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित दादांना प्रत्युतर दिलं आहे. (Chandrakant Patil’s reply to Deputy CM Ajit Pawar)

अजित पवार यांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही. 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र ड्रावरमधून कुणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की 54 आमदारांचा पाठिंबा आहे? अशाप्रकारे सरकार बनवणाऱ्यांनी खरं तर जपून बोललं पाहिजे, असं खोचक उत्तर चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना दिलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 80 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी फडणवीस आणि अजितदादा यांचा पहाटेच्या वेळी शपथविधी पार पडला होता. मात्र, बहुमत नसल्यानं हे सरकार टिकू शकलं नव्हतं. त्यावरुन चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात वाक् युद्ध सुरु आहे.

‘मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…!’

अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला होता. “चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळय. अमकंय तमकंय… कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे. ‘मी वाटच पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार! लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव…. कितीदा सांगायचं की हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही”, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

तत्पूर्वी, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असताना पडेल असा दावा केला होता. “महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल”, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

‘मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…!’ अजितदादांचा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना टोला

Chandrakant Patil’s reply to Deputy CM Ajit Pawar