दोघांनीही माझ्याकडे राहायला या, सुनेचे मारहाणीचे आरोप खासदार रामदास तडसांनी फेटाळले!

| Updated on: Sep 08, 2021 | 10:34 AM

माझा मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहत असल्याचं सांगत या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही. ही वैयक्तिक नवरा बायकोची भांडणं आहेत. यात राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही, असं खासदार रामदास तडस म्हणाले.

दोघांनीही माझ्याकडे राहायला या, सुनेचे मारहाणीचे आरोप खासदार रामदास तडसांनी फेटाळले!
भाजप खासदार रामदास तडस आणि त्यांच्या सूनबाई पूजा तडस
Follow us on

वर्धा : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तडस यांच्या सुनेने मदतीची मागणी केली आहे. तसा व्हिडीओच चाकणकरांनी ट्विट केला आहे. दरम्यान, रामदास तडस यांनी मारहाणीचे आरोप फेटाळताना मुलगा आणि सुनेची भांडणं आहेत, यात माझी काही संबंध नाही, उलट मी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

माझा मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहत असल्याचं सांगत या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही. ही वैयक्तिक नवरा बायकोची भांडणं आहेत. यात राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही. मी दोघांच्या भांडणात मध्यस्थाची भूमिका निभावली. मी पूजाला आताही सून मानतो, पुढेही मानेन, दोघांनीही माझ्याकडे राहायला यावं, असं तडस म्हणाले.

रामदास तडस यांची नेमकी भूमिका काय?

“माझा मुलगा पंकज आणि पूजाचं लग्न झालं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघेही वर्ध्याला राहू लागले. काही काळानंतर पूजा माझ्या घरी राहायला आली. दरम्यानच्या काळात पंकज आणि पूजाचं भांडणं झालं होतं. माझ्या वडिलांना न विचारता आपण लग्न केलंय. त्यावेळी आपलं असं ठरलं होतं की आपण वर्ध्याला रहायचं. मग आता तू त्यांना त्रास द्यायला त्यांच्याकडे का गेली, असं पंकजने पूजाला विचारलं…”

“ही भांडणं सुरु असताना मी वर्ध्याला होतो… मला घरुन फोन येताच मी तत्काळ पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली…. पोलिसांनी भांडणं सोडवली… मी देखील वर्ध्याहून घरी पोहोचलो… तोपर्यंत पंकज वर्ध्य़ाला निघून गेला होता… त्यानंतर पूजा माझ्याजवळ 2 महिने राहिले. पण मी एकेदिवशी तिला सांगितलं की, अशी रुसून तू इथे किती दिवस राहणार आहे,… तू पंकजकडे वर्ध्याला जायला हवं…. ”

“माझ्या बोलण्यानंतर ती वर्ध्याला न जाता तिच्या घरी गेली… आता याच्यात माझा कवडीचाही दोष नाहीय…. मी तिला माझी सून मानतो… इथून पुढेही मानेन… त्या दोघांनीही आमच्या धरी यावं… रहावं… हीच माझी इच्छा आहे…”, अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली.

पूजा तडस यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय?

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते”

रामदास तडस यांना अटक करा : रुपाली चाकणकर

मला आज सकाळी लवकरच पूजाचा फोन आला. फोनवर त्या रडत होत्या. माझ्याकडे मदतीची मागणी त्या करीत होत्या. त्यानंतर मला त्यांनी सविस्तर प्रकरण सांगितलं. गेले अनेक दिवस रामदास तडस, त्यांचा मुलगा आणि तडस कुटुंबीय तिला मारहाण करत आहेत. तिच्या जीवाला धोका असल्याचं तिने मला सांगितलं. तसंच मला इथून घेऊन चला, अशी विनवणी तीने माझ्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी तत्काळ रवान झाले आहेत. त्यांची सर्वोतोपरी मदत केली जाईल. यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं सुरु आहे. सरकार आणि पोलिसांच्या वतीने देखील तत्काळ अॅक्शन घेतली जाईल…

परंतु झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केलीय.

(BJP Wardha MP Ramdas tadas Denies Allegation Daughter in Law Pooja tadas)

हे ही वाचा :

रुपालीताई प्लीज मला घेऊन चला, वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी, कुटुंबाकडून मारहाण?