पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे सुरु

पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे सुरु
अकोला जिल्हा परिषद
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 1:58 PM

अकोला : धुळे, अकोला, वाशिम, नंदुरबार, नागपूर जिल्ह्यातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं रद्द ओबीसींच्या अतिरिक्त जागा रिक्त झाल्या आहेत. पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.(By Election in ZP and Panchayat Samiti of AKola, Nagpur, Washim Dhule Nandrubar starts from today)

अकोल्यात  जिल्हा परिषदेच्या 14 आणि  पंचायत समितीच्या 28 जागांसाठी प्रक्रिया

अकोला जिल्ह्यात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. अकोल्यात 14 जिल्हा परिषद व 28 पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

ऑनलाईन अर्ज भरावे लागणार

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 14 आणि सात पंचायत समित्यांच्या 28 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज 29 जूनपासून सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार असून , ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रिंट काढून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. तर, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर करण्यात आली आहे.

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31

19 जुलैला मतदान 

पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकार्‍यांनी स्विकारण्याचा कालावधी हा 29 जुन ते 5 जुलै असा आहे. यासाठी सकाळी 11 ते दु 3 हा वेळ निश्चित करण्यात आला आहे. रविवार, 4 जुलै रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाहीत.  नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय 6 जुलै रोजी घेण्यात येईल. वैध उमेदवारांची घोषणा देखील त्याच दिवशी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 12 जुलै पर्यंत मुदत राहील.
निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी व निशाणी ही 12 जुलै रोजी दू.3.30 वा. प्रसिध्द केली जाईल. जिथे अपिल आहे तिथे 14 जुलै रोजी दू.3.30 वाजता उमेदवाराची यादी व निशाणी वाटप निश्चित होईल. 19 जुलै रोजी मतदान आणि 20 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल. 23 जुलै रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या:

राज्यातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे सौ चुहे खाके… जयंत पाटलांची फडणवीसांवर नाव न घेता टीका

तुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? , देवेंद्र फडणवीसांचा सवाल

(By Election in ZP and Panchayat Samiti of AKola, Nagpur, Washim Dhule Nandrubar starts from today)