कामाला गेलं की ‘हा’ खासदार म्हणतो, दारूचं दुकान लाव… राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, राहुल गांधी यांनाच पत्र, काय तक्रार?

दारू विकणारे, ठेकेदारांकडून वसुलीसाठी गुंड पोसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊ नका, अशी विनंती राहुल गांधी यांना करण्यात आली आहे.

कामाला गेलं की हा खासदार म्हणतो, दारूचं दुकान लाव... राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, राहुल गांधी यांनाच पत्र, काय तक्रार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2022 | 9:24 AM

चंद्रपूरः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) वाद चव्हाट्यावर आला आहे. चंद्रपुरातील खासदाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी (Loksabha Election) इथल्या खासदाराने 100 दारुची दुकानं थाटण्याचं टार्गेट फिक्स केलंय. सध्या त्याची 17 दुकानं आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला भविष्यात खासदारकीचं तिकिट देताना विचार करा, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे पाटील यांनी खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्याविरोधात ही तक्रार केली आहे.

मोरेश्वर टेमुर्डे पाटील यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्र पाठवलं. माध्यमांसमोरही त्यांनी आपले आरोप स्पष्टपणे बोलून दाखवले. टेमुर्डे पाटील म्हणाले, काही कामासाठी गेलं तर गावात दारुचं दुकान लाव, असं सांगणारा हा खासदार आहे.

लोकांना हे सांगितलं तर खरं वाटणार नाही. लोकसभा मतदार संघात यांनी काहीही भरीव काम केलेलं नाही. पण गावा-गावात दारूची दुकानं लावली. आज त्यांच्याकडे 17 दुकानं आहेत.

पुढच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी 100 दारुची दुकानं उघडण्याचं त्यांचं टार्गेट आहे, असा आरोप टेमुर्डे पाटील यांनी केलाय.

दारू विकणारे, ठेकेदारांकडून वसुलीसाठी गुंड पोसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊ नका, अशी विनंती टेमुर्डे पाटील यांनी राहुल गांधी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

एकूणच, चंद्रपुरात काँग्रेस खासदाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या गंभीर आरोपांची दखल राहुल गांधी घेतात की नाही, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.