“अंधेरीची पोटनिवडणूक तर जिंकूच!, पण…”, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढचं टार्गेट सांगितलं…

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा अंधेरीची पोट निवडणूक जिंकण्याचा ठाम दावा केलाय.

अंधेरीची पोटनिवडणूक तर जिंकूच!, पण..., चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढचं टार्गेट सांगितलं...
| Updated on: Oct 16, 2022 | 1:01 PM

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी पुन्हा एकदा अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri By-Election) जिंकण्याचा ठाम दावा केलाय. आम्ही अंधेरीची पोट निवडणूक जिंकणारच आहोत. त्यात कुठलीच शंका नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत. लोक आम्हाला निवडून देतील, असं बावनकुळे म्हणाले आहेत. याच सोबत त्यांनी पुढच्या निवडणुकीतील निकालाबाबतही भाष्य केलंय.

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका महाविकास आघडी सत्तेत असताना झाल्या. त्याच्या सभापतीपदाची निवडणूक आता झाली. त्यात काँग्रेसला बहुमत मिळालं. त्यामुळे बहुमत त्यांच्याकडे असल्याने सभापती त्यांचाच होणार हे निश्चित आहे. पण येत्या काळात येणाऱ्या निवडणुका आम्हीच जिंकू, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा पोटनिवडणुकीचं वारं वाहतंय. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक लागली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

दोन्ही बाजूने विजयावर दावा केला जातोय. या मतदार संघात ठाकरे गटाच्या नेत्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होतेय. यात विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहावं लागेल. यावरच बावनकुळेंनी भाष्य केलंय. विजयी गुलाल आमचाच असेल, असं ते म्हणालेत.