भाजपचं मिशन लोकसभा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा औरंगाबादेत दौरा, बावनकुळेंनी अजेंडा सांगितला…

| Updated on: Dec 30, 2022 | 1:59 PM

2024 च्या फडणवीस आणि शिंदेंच्या समन्वयातून आम्ही 45 लोकसभा जिंकू. चंद्रपूर आणि औरंगाबादमधील निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

भाजपचं मिशन लोकसभा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा औरंगाबादेत दौरा, बावनकुळेंनी अजेंडा सांगितला...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) भाजपने मोठी रणनीती आखली आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) 45 प्लस अर्थात राज्यातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा अजेंडा आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तर नव्या वर्षात औरंगाबाद आणि चंद्रपुरात भाजप लोकसभा प्रचाराचं नारळ फोडणार आहे. औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जे पी नड्डा यांची संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेच्या निमित्ताने जे पी नड्डा प्रथमच औरंगाबाद शहरात येत आहेत. भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनीदेखील या सभेविषयी माहिती दिली. जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जे पी नड्डा वेरुळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यानंतर ते सभास्थळी हजेरी लावतील.

सभा झाल्यानंतर ते गंगापूर, कन्नड, वैजापूर तसेच शहरातील मतदारसंघांची भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. जे पी नड्डा यांच्या या दौऱ्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे आदी उपस्थित राहतील.

नागपुरात आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सभांबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात लोकसभा प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात 18 मतदार संघांची निवड झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात १७ मतदार संघ आहेत. या प्रवासात केंद्रीय आणि राज्याचे मंत्री काम करणार आहेत.

केंद्र सरकारच्या देशासाठी ज्या योजना आखल्या आहेत, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या सभांच्या माध्यमांतून केलं जाईल. त्यामुळे 2024 च्या फडणवीस आणि शिंदेंच्या समन्वयातून आम्ही 45 लोकसभा जिंकू. चंद्रपूर आणि औरंगाबादमधील निवडणूक आम्हीच जिंकणार, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएमचे इम्तियाज जलील तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आले आहेत.