अजित पवार धरणवीर!; चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘त्या’ विधानावरून दादांना घेरलं…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार धरणवीर!; चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या विधानावरून दादांना घेरलं...
| Updated on: Jan 03, 2023 | 1:27 PM

भिवंडी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलंय, ते महाराष्ट्राला लाजवणारं आहे. अजित पवारांना  महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. अजित पवार धरणवीर आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

विधिमंडळ अधिवेशनात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणणं चूक आहे. ते स्वराज्य रक्षक होते असं म्हटलं. त्यावरून भाजपने त्याच्यावर जोरदार टीका केली. ठिकठिकाणी आंदोलनंही झाली. आता बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी त्यांचा छळ केला. तेव्हा धर्माचं रक्षण करणारे संभाजीराजे होते. कितीही अत्याचार केला गेला तरी त्यांनी धर्म सोडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुघलशाही स्वीकारली आहे. ती राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

काल जितेंद्र आव्हाड पण जे बोलले ते योग्य नव्हतं. शिवाजी महाराज आयुष्यभर औरंगजेबाविरोधात लढले आणि तुम्ही म्हणता क्रूर नव्हते. मतांसाठी इतिहासाची मोडतोड करताय. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा आपले शब्द मागे घेतले पाहिजेत, असं बावनकुळे म्हणालेत.

मागच्या सरकारमध्ये छोट्या घटनेवरून 12 आमदार निलंबित केलं. आता तर फक्त अधिवेशनात निलंबित केलं आहे. सांगली बँकेबद्दल जी चौकशी आहे. कोणत्याही चौकशीला सामोरं गेलंच पाहिजे. सीबीआयला सुद्धा आता कोणताही तपास करता येईल याबद्दल सरकारचं अभिनंदन. कोणत्याही भ्रष्टाचाराची आता थेट चौकशी करता येणार आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार 18 तास काम करतं. एक काळ होता की फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होतं. 18 महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हतं, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. आज एक अष्टपैलू कर्तृत्त्वाचा कार्यकर्ता हरपला. ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. आमच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने चांगला नेता गमावल्याचं दु:ख आहे, असं बावनकुळे म्हणालेत.