CM Eknath Shinde | राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा मुहूर्त, मुख्यमंत्री नांदेड-हिंगोलीच्या दिशेने रवाना

| Updated on: Aug 08, 2022 | 3:06 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरील महत्त्वाची बैठक नंदनवन या बंगल्यावर झाली. यानंतर हे दोघेही काही वेळातच राज्यपालांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र नंदनवन बंगल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच बाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. 

CM Eknath Shinde | राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा मुहूर्त, मुख्यमंत्री नांदेड-हिंगोलीच्या दिशेने रवाना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महिनाभरापेक्षा जास्त दिवस प्रलंबित राहिलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उद्याचा म्हणजेच 9 ऑगस्ट रोजीचा मुहूर्त मिळाल्याची माहिती हाती आली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच महत्त्वाची बैठक पार पडली.  यामुळे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड (Nanded) आणि हिंगोली दौरा (Hingoli) रद्द करण्यात येईल का अशी चर्चा होती. मात्र ही बैठक संपताच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यातील मंत्र्यांच्या यादीवर तसेच खातेवाटपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यादरम्यान महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर ही बैठक झाली. यानंतर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड आणि हिंगोली दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दौरा काहीसा लांबला. अखेर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे नांदेडच्या दिशेने रवाना झालेत. मराठवाड्यातील मुख्यमंत्र्यांचा दुसरा दौरा आहे.

हजारो शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत

मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी जय्यत तयारी केली आहे. या निमित्ताने नांदेड आणि हिंगोलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं मोठं शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. आमदार संतोष बांगर यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या हिंगोली येथील सभेला किमान 50 हजार शिवसैनिक येतील. एवढी गर्दी जमली नाही तर माझं नाव बदला, असा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. हिंगोलीत आज कावड यात्रेचंही आयोजन करण्यात आलंय. येथेही शिवसैनिकांचा मोठा उत्साह पहायला मिळतोय.

‘नंदनवनमधील बैठकीनंतर राज्यपालांना भेटणार’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरील महत्त्वाची बैठक नंदनवन या बंगल्यावर झाली. यानंतर हे दोघेही काही वेळातच राज्यपालांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र नंदनवन बंगल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच बाहेर पडले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.  उद्या पहिल्या टप्प्यात 20 ते 25 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यातील भाजप आणि शिंदे सेनेतील काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचीही चर्चा आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, प्रवीण दरेकर, रवी राणा, नितेश राणे आदींचा समावेश आहे. तर शिंदे गटातील दीपक केसरकर, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले, उदय सामंत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.