महाराष्ट्राच्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

मुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असतानाही आपल्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कोणतंही उत्तर नसल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला […]

महाराष्ट्राच्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला, मनसेच्या माजी आमदाराचा आरोप
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असतानाही आपल्या हक्काचं 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत कोणतंही उत्तर नसल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला खोटी माहिती दिल्याचा आरोप भोसले यांनी केला. राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. पण या परिस्थितीतही हक्काचं पाणी गुजरातला दिलं जातंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणताही करार झाला नव्हता. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत आहेत, असा आरोपही नितीन भोसले यांनी केलाय.

नितीन भोसले 13 दुष्काळी जिल्ह्यात पाणी यात्रा काढणार आहेत. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रासाठी साठवून परत वळवावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला देऊन मोदी-शाह यांना खुश केलं जातंय. मुख्यमंत्र्यांशी अनेकदा बोलणं झालंय, पण आमच्याकडे पैसा नसल्याचं उत्तर ते देतात. केंद्र जेव्हा पैसा देईल तेव्हा आम्ही विचार करु, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं नितीन भोसले यांनी सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांवर गुजरातला पाणी दिल्याचा आरोप केला होता. पण आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना झालेला पाणी देण्याचा करार मी स्वतः रद्द केला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी भरसभेत खोटी माहिती दिली, असा आरोप नितीन भोसले यांनी केलाय. यापूर्वी नितीन भोसले यांनी याविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली होती.

‘एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही’ ही राज्य सरकारची फक्त वलग्ना आहे. 1 एप्रिललाच गुजरातला पाणी सोडण्याचं प्रस्तावित करण्यात आल्याचं यापूर्वी भोसले म्हणाले होते. नार-पार, तापी, नर्मदा, दमनगंगा, पिंजाळ या नद्यांतून तब्बल 1330 दशलक्ष घन मीटर पाणी कच्छ आणि सौराष्ट्रकडे वळवण्याचा हा प्रस्ताव म्हणजे राज्यात पाण्याची कमतरता असतानाही लोकांच्या हक्काचं पाणी पळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नितीन भोसले यांनी केला होता.

VIDEO : नितीन भोसले यांच्याशी बातचीत