Santosh Bangar | 50 हजार शिवसैनिक आले नाही तर नाव बदलायचं… मुख्यमंत्री शिंदेंच्या हिंगोली दौऱ्यावेळी संतोष बांगर यांचा दावा

| Updated on: Aug 08, 2022 | 12:58 PM

मुख्यमंत्री हिंगोलीत आल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास ते भव्य कावड यात्रेत सहभागी होतील. त्यानंतर पाच वाजता गांधी चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

Santosh Bangar | 50 हजार शिवसैनिक आले नाही तर नाव बदलायचं... मुख्यमंत्री शिंदेंच्या हिंगोली दौऱ्यावेळी संतोष बांगर यांचा दावा
आमदार संतोष बांगर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंगोलीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या समर्थनासाठी हिंगोली ते मुंबई अशी महारॅली काढणारे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आज हिंगोलीत (Hingoli Shivsena) आणखी एक शक्तिप्रदर्शन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही जिल्ह्यांत विविध ठिकाणी त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. हिंगोलीतदेखील आमदार संतोष बांगर यांनी शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. एकनाथ शिंदे हिंगोलीत जी सभा घेतील, त्यात 50 हजार शिवसैनिक उपस्थित असतील, एवढे कार्यकर्ते आले नाहीत तर माझं नाव बदलायचं असा दावा संतोष बांगर यांनी दिलाय. आज हिंगोलीत महादेवाची कावड यात्रा आहे. यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. याचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे.

संतोष बांगर काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी तसेच चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून निगणाऱ्या यात्रेत तब्बल 50 हजार शिवसैनिक आणि शिवभक्त सहभागी होतील. या कावड यात्रेसाठी 75 ट्रक इथं उभे आहेत. एका ट्रकमध्ये 200 जण. अनेक चार चाकीही उभ्या आहेत. अशा प्रकारे हजारो शिवसभक्त कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचतील. तेथून हिंगोलीच्या दिशेने पदयात्रा निघणार असल्याचं संतोष बांगर यांनी सांगितलं. यातील एकूण शिवसैनिकांची संख्या जवळपास 50 हजारांच्या घरात असेल. ती नसली तर माझं नाव बदलायचं असं आमदार संतोष बांगर म्हणाले.

दुपारी मुख्यमंत्री हिंगोलीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते त्यांचा हिंगोलीत नियोजित दौरा आहे. हिंगोलीत आल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास ते भव्य कावड यात्रेत सहभागी होतील. त्यानंतर पाच वाजता गांधी चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ते हिंगोलीतून औंढा नागनाथकडे प्रयाण करतील. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन ते रात्री नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.

नांदेडमधील दौऱ्यात काय?

खासदार हेमंत पाटील यांच्या नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौऱा आयोजित करण्यात आल आहे. मागील महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आज नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी करतील. त्यानंतर शहरात शिंदे शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करतील. तत्पुर्वी नांदेडमध्ये आगमन झाल्यानंतर ते हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे दर्शन घेतील.