काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार, वंचितच्या 288 जागांसाठी मुलाखती सुरु

| Updated on: Jul 12, 2019 | 7:40 PM

राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. 13 जुलै म्हणजे उद्यापासून इच्छुक उमेदवार मुलाखती देतील आणि उमेदवारीचा दावा करतील.

काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार, वंचितच्या 288 जागांसाठी मुलाखती सुरु
Follow us on

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. 13 जुलै म्हणजे उद्यापासून इच्छुक उमेदवार मुलाखती देतील आणि उमेदवारीचा दावा करतील. वंचितने याअगोदर काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली होती.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घ्यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. यासाठी बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं. पण पावसामुळे ही बैठक रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. वंचितने फक्त 40 जागांची ऑफर देऊन आघाडीमध्ये जाण्याबाबतची भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केल्याचं बोललं जातंय. त्यातच सर्व जागांसाठी मुलाखती म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही वंचितेन स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

विदर्भातील इच्छुक उमेदवारांसाठी 13, 14 आणि 15 जुलैला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील. 13 जुलैला नागपूर, 14 जुलै अमरावती आणि 15 जुलैला अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये मुलाखती घेतल्या जातील. तर मराठवाड्यासाठीच्या मुलाखती औरंगाबादेतून सुरु होणार आहेत. काँग्रेसच्या प्रतिसादाची कोणतीही वाट न पाहता वंचितने विदर्भातील सर्व जागांच्या मुलाखतीचं आयोजन केलंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळीही चर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकरांनी अनेक ठिकाणचे उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेस आणि वंचितमध्ये बैठक झाली तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी 48 पैकी 22 उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही जाहीर केलेल्या जागा सोडून इतर जागांबाबतच काँग्रेसने बोलावं, असं वंचितकडून सांगण्यात आलं होतं आणि अखेर वंचितने स्वबळावर निवडणूक लढवली.

लोकसभा निवडणुकीत मतांचं झालेलं विभाजन पाहता वंचितला सोबत घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राज्यातील 10 ते 12 जागांवर काँग्रेसचा उमेदवार जेवढ्या फरकाने पराभूत झाला, त्यापेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवाराने घेतली होती. याचाच फटका काँग्रेसला बसला आणि लोकसभेला राज्यात फक्त एक जागा जिंकता आली.