अशोक चव्हाणांची पुन्हा गैरहजेरी, कुठे आहेत ? काँग्रेसचा बडा नेता महामोर्चात का नाही?

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी झालेले दिसले नाहीत

अशोक चव्हाणांची पुन्हा गैरहजेरी, कुठे आहेत ? काँग्रेसचा बडा नेता महामोर्चात का नाही?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 17, 2022 | 1:22 PM

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारविरोधात महाविकास आघाडीचा पहिलाच महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ऐन हिवाळ्यात मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) भंग करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरीही सरकारच्या विरोधात आमची मोट पक्की आहे, हेच आघाडीच्या नेत्यांनी वारंवार दाखवून दिलंय. याच एकजुटीतून महाराष्ट्र सरकारच्या चुकांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकवटले आहेत. पण यात गैरहजर असलेल्या एका चेहऱ्याची जास्त चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी झालेले दिसले नाहीत. यावरून चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याचीही चर्चा आहे.

त्यामुळेच आजची त्यांची गैरहजेरी जास्त ठसतेय. यावर अशोक चव्हाण यांनीच स्पष्टीकरण दिलंय. अशोक चव्हाण सध्या त्यांच्या मूळ गावी नांदेडमध्येच आहेत. निकटवर्तीयाच्या लग्न सोहळ्यामुळे मला आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला जाता आलं नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे.

मी महामोर्चात सहभागी झालो नसलो तरीही या मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी यावर सविस्तर प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं..

महामोर्चात कोण-कोण?

महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरावा अशा या महामोर्चात प्रथमच सर्वपक्षांचा सहभाग दिसून आला. विविध पक्षांचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी झाले. मोर्चात उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे नाना पटोले, भाई जगताप आदी नेत्यांनी सहभाग नोंदवला.

तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माकपा, रिपाइ आणि आंबेडकरी संघटनादेखील या मोर्चात सहभागी झाल्या.