काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भगवा शेला! Video व्हायरल,चर्चा तर होणारच, काय घडलं?

अशोक चव्हाण यांनी घातलेल्या भगव्या शेल्याचा हा व्हिडिओ महाविकास आघाडी तसेच काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनच शेअर करण्यात आलाय.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या गळ्यात भगवा शेला! Video व्हायरल,चर्चा तर होणारच, काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 06, 2023 | 2:57 PM

राजीव गिरी, नांदेड | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भारतीय जनता पार्टीत (BJP) जाण्याच्या चर्चा नेहमीच रंगतात. अशोक चव्हाण अनेकदा काँग्रेसच्या कार्यक्रमांना गैरहजर असले की हे संशयाचे ढग अधिक गडद होतात. अशातच अशोक चव्हाण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात त्यांनी गळ्यात चक्क भगवा शेला घातलाय. राज्यात एकिकडे भाजप आणि शिंदे युतीला अधिक बळ प्राप्त होत असतानाच अशोक चव्हाण यांनी गळ्यात घातलेल्या भगव्या शेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण हा नेमका का घातलाय, याचं उत्तर चव्हाण यांनीच त्या व्हिडिओत दिलंय..

अशोक चव्हाणांचं उत्तर काय?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या गळ्यात हा भगवा शेला होता. भाषणादरम्यान, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, ‘ तुम्ही विचार करत असाल, माझ्या गळ्यात भगवा शेला कसा.. तोच भगवा शेला उंचावत अशोक चव्हाण म्हणाले, ही महाविकास आघाडीची सभा आहे. ही शिवसेना आहे. हातात घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उर्वरीत सगळं म्हणजे काँग्रेस आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल

अशोक चव्हाण यांनी घातलेल्या भगव्या शेल्याचा हा व्हिडिओ महाविकास आघाडी तसेच काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनच शेअर करण्यात आलाय. त्यामुळे या व्हिडिओचा गैर अर्थ कुणी घेणार नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारवर टीका

अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील एका मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘ मोकळपणाने कुणी बोलू, लिहू शकत नाहीत. अशी स्थिती आहे. सरकारच्या विरोधात बोललात तर लोकांना जीवे मारण्यापर्यंत घटना घडतात. ही देशाची शोकांतिका आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश असो… यांनी प्राणांची पर्वा नाही केली. पण त्यांना त्यात प्राण गमवावा लागला. तपास सुरुच आहे. पण केव्हा संपेल सांगता येत नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास उडाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नसेल तर लोकांनी पहायचं कुणाकडे, असा सवाल अशोक च्वहाण यांनी केलाय.