राहुल गांधींचा कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास कसा? जेवण कसे? राहतात कुठे? कपडे धुण्याची सोय काय?

| Updated on: Sep 08, 2022 | 12:16 PM

सामान्य माणसाला जोडण्यासाठी ही यात्रा असल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलंय. त्यामुळेच यात्रेचा प्रवास आणि राहण्या-खाण्याच्या सुविधा साधेपणा दिसेल, अशाच देण्यात आल्यात.

राहुल गांधींचा कन्याकुमारी ते काश्मीर प्रवास कसा? जेवण कसे? राहतात कुठे? कपडे धुण्याची सोय काय?
भारत जोडो यात्रेवर राहुल गांधी
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्लीः  लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) गुरुवारपासून भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा हा 150 दिवसांचा प्रवास आहे. 12 राज्यांतून ही यात्रा असेल. एकूण 3570 दिवसांचा प्रवास. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत, म्हणून त्यांच्या यात्रेत सगळ्या सुविधा फाईव्ह स्टारच्याच असतील, असा समज होऊ शकतो. पण तसं नाहीये. राहुल गांधींची ही यात्रा अगदी साधेपणाने नियोजित करण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान मी कदापि हॉटेलमध्ये थांबणार नाही, हे राहुल गांधींनी आधीच स्पष्ट केलं होतं. राहुल गांधींसोबत यात्रेत जवळपास 300 जण पदयात्रा करत आहेत. यावेळी ते चालत्या फिरत्या कंटेनर्समध्ये राहत आहेत. यातच झोपण्यासाठी बेड, टॉयलेट आणि काही ठिकाणी एसीचीही सुविधा आहे.

यात्रेदरम्यान, काही ठिकाणी प्रचंड उष्णता असू शकते. यामुळे प्रकृती ठिक राहण्यासाठी काही कंटेनर्समध्ये एसीची सुविधा देण्यात आली आहे.

भारत जोडो यात्रा ही सामान्य माणसांना जोडणारी आहे, असं काँग्रेसने म्हटलंय. त्यामुळेच ती अगदी साधेपणाने करण्यावर भर आहे. चालत्या फिरत्या कंटेनर्समध्ये रहायचं आणि तंबू टाकून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या, असं यात्रेचं स्वरुप आहे.

दररोज नवं गाव थाटतं…

150 दिवसांच्या यात्रेत राहुल गांधी जिथे असतील तिथे दररोज एक नवं गाव वसवलं जातंय. जवळपास 60 कंटेनर्सद्वारे हे गाव थाटलं जातंय. हे कंटेनर्स ट्रकवर ठेवलेत.

हे कंटेनर्स राहुल गांधींसोबत चालत नाहीत तर ठरवलेल्या गावात मुक्कामी असतात. दिवस संपला की यात्रेतील लोकांपर्यंत हे कंटेनर्स पोहोचतात.

एखाद्या गावात नियोजित ठिकाणी कंटेनर्स उभे राहतात. रात्री मुक्काम होतो.

एका कंटेनरसमध्ये 12 जण झोपू शकतात. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी स्वतंत्र कंटेनरमध्ये झोपतात.

यात्रेत नेहमीसाठी सोबत असलेले लोक आणि राहुल गांधी सोबतच जेवण करतात. ते त्यांच्या आसपासच राहतात.

दिवसाला 22 किमी पायी

राहुल गांधींची यात्रा जवळपास 5 महिने चालेल. दररोज 22 ते 23 किमीचा प्रवास केला जाईल.

कपडे कुठे धुणार?

यात्रेतल्या नेत्यांना सूचना करण्यात आल्यात. 3 दिवसातून एकदा कपडे धुण्याची सोय असेल.

रोज सकाळी 7 ला यात्रा सुरु होते. सकाळी 10 पर्यंत काम. थोडी विश्रांती. पुन्हा काम. दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7 पर्यंत काम. 7 नंतर जेवण आणि विश्रांती, असे स्वरुप आहे.

यात्रेत कोण कोण?

राहुल गांधींच्या यात्रेत 117 नेते सहभागी आहेत. त्यात 28 महिला असून त्यांना राहण्यासाठी वेगळे कंटेनर्स आहेत.

सामान्य कार्यकर्तेही यात्रेत आहेत. तसेच सुरक्षारक्षक, पक्षाच्या संपर्क अभियानाची टीम, फोटो ग्राफर, सोशल मीडिया सांभाळणारे सदस्य आहेत. हे सर्व मिळून जवळपास 300लोक आहेत.

स्वयंपाक कोण करतं?

राहुल गांधींच्या यात्रेत काँग्रेस नेतेच नाश्ता आणि जेवण तयार करतात. काही ठिकाणी संबंधित राज्यातील काँग्रेस नेते खाण्या-पिण्याची सोय करतील. पण नाश्ता आणि जेवण सर्वांनी एकत्र बसून करावे, असा यात्रेचा नियम ठरवण्यात आलाय.

राज्यानुसार टायटल साँग…

राहुल गांधींच्या यात्रेसाठी खास टायटल साँग तयार कऱण्यात आलंय. ज्या राज्यात जातील तिथे त्या भाषेनुसार हे गाणे लावले जाईल.