
मुंबई : सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र बीएमसी (BMC) त्यांचा राजीनामा मंजूर करत नसल्याने चांगलाच वाद पेटला आहे. ऋतुजा लटके यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून, दोन्ही गटांकडून एकोमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या प्रकरणावर काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ऋतुजा लटके यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. हा निर्णय सोनिया गांधी यांचा आहे. देशात आणि राज्यात सध्या जी काही परिस्थिती आहे, त्याच्याशी एकत्र होऊन लढल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर बोलताना नाना पटोले यांनी शिंदे, फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे. सध्या राज्यात ईडीचं सरकार आहे. हे ईडीचं सरकार घाबरट असून, जनतेसाठी नाही तर गुजरातसाठी काम करते. दिल्लीमध्ये जे त्यांचे दोन आका बसले आहेत, त्यांच्यासाठी काम करते असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की सध्याचं सरकार हे गुजरातसाठी काम करते म्हणून राज्यातील वेदातांसारखे प्रकल्प गुजरातला गेले. मुंबईत लोकलमध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र या सरकारने आल्या-आल्याच मेट्रोच्या पॅकेजला मंजुरी दिली, कारण काय तर गुजरातचा फायदा झाला पाहिजे. यातून ऋतुजा लटके यांचा राजीनामा न घेण्यासाठी दबाव टाकला गेल्याची शक्यता असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.