Dawood Ibrahim: मोठी बातमी! दाऊदच्या घराचे पाडकाम तात्पुरता मध्येच थांबवलं, नेमकं काय घडलं?
Dawood Ibrahim house Demolition: मुसाफिरखानामध्ये सुरु असणारी तोडक कारवाई तात्पुरती मध्येच थांबवण्यात आली आहे. जितकं पाडकाम झालं आहे त्याचे फोटो काढण्यात आले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडिलोपार्जित घर मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेन येथे आहे. काल BMCने या घरावर बुल्डोझर फिरवण्याचे काम सुरु केले. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यासाठी आज सकाळपासून बुलडोझर लावून सुरुवात करण्यात आली होती. मात्र, आता हे पाडकाम मध्येच थांबवण्यात आले आहे. 25 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे.
मुसाफिरखाना मधील मशिदीची जागा रिकामी करण्यासाठी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिशीला आता न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. महापालिकेच्या सी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 16 नोव्हेंबर रोजी ही नोटीस जारी केली होती. 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी नोटीस लावून 18 नोव्हेंबरपर्यंत मशिदीची जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या नोटिशीविरोधात शेख अब्दुल रझाक आणि अन्य एका याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. नोटिशीच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती देण्यासह नोटीस रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच, ही नोटीस नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारी असून, सर्वोच्च न्यायालय आणि वक्फ न्यायाधिकरणाच्या पूर्वीच्या आदेशांच्या विरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
काल धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी
मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया लेनमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या वडिलोपार्जित घर आणि संबंधित इमारतीवर महापालिकेने बुलडोझर फिरवला. हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही जीर्ण आणि धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्याची तयारी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली. यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर आज तोडकामाची सुरुवात करण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.
महापालिकेने इमारतीची पाहणी केल्यानंतर ती धोकादायक असल्याचे समोर आले होते. उच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने महापालिकेला आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने अधिकृत नोटीस काढून इमारत तोडण्याची प्रक्रिया सुरू केली. आजच्या कारवाईत बुलडोझर आणि इतर यंत्रसामग्री वापरली गेली. पण आता हे काम तात्पुरता थांबवण्यात आले आहे.