तो मुख्यमंत्र्यांचा…रायगडच्या पालकमंत्रिपदावर अजितदादांचं मोठं विधान, लवकरच…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले हे दोन्ही नेते या पदासाठी अडून बसल्यामुळे या जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळू शकलेला नाही. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

तो मुख्यमंत्र्यांचा...रायगडच्या पालकमंत्रिपदावर अजितदादांचं मोठं विधान, लवकरच...
ajit pawar
| Updated on: May 18, 2025 | 10:08 PM

Raigad Guardian Minister Post : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिरस्त्याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाला आहे. रायगड जिल्ह्याला मात्र अद्याप पालकमंत्री मिळालेला नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले हे दोन्ही नेते या पदासाठी अडून बसल्यामुळे या जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळू शकलेला नाही. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. या विधानानंतर रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्रिपद मिळणार, असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लवकरच रायगड जिल्ह्याला…

अजित पवार रायगडमध्ये बोलत होते. माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी रायगडच्या पालकमंत्रिपादावर भाष्य केलंय. आम्ही पालकमंत्रिपद थांबवून ठेवलेले नाही. रायगडला पालकमंत्री लवकरच मिळेल. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही जिल्ह्याला काही कमी पडू दिलेलं नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच रायगड जिल्ह्याला वार्षिक योजनेचे पैसे नेहमीपेक्षा जास्तीच दिले आहेत. गतीने कामं कशी करता येतील यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भर आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

…तर कार्यकर्त्यांनी तयार राहायला हवे

आगामी काही दिवसांत राज्यात महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलंय. आपआपल्या भागात कार्यकर्त्यांनी तयारी केली पाहिजे. उद्या निवडणुका जाहीर झाल्या तर कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. काही निर्णय जिल्हा पातळीवर होतील. काही निर्णय राज्य पातळीवर होतील, असं अजित पवारांनी म्हटलंय.

पालकमंत्रिपदाचा नेमका वाद काय?

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर काही दिवसांनी सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. याच यादीत रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं. नंतर मात्र भरत गोगावले यांनी हे पद आपल्यालाच पाहिजे, असा आग्रह धरला. त्यानंतर सरकारने नवा निर्णय घेत, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठीच्या पालकमंत्रिपदावर नंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. तेव्हापासून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त आहे. या दोन नेत्यांपैकी पालकमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.