Govinda | मृत गोविंदांची किंमत भाजप-शिंदे पैशांत करणार? संदेश दळवीच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षनेत्यांची आगपाखड

संदेश दळवी हा 22 वर्षांचा तरुण विलेपार्ले ईस्ट येथील शिवशंभो गोविंदा पथकात शामील होता. हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले येथील बावनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते.

Govinda | मृत गोविंदांची किंमत भाजप-शिंदे पैशांत करणार? संदेश दळवीच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षनेत्यांची आगपाखड
शिंदे सरकारवर अंबादास दानवे यांची टीका
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2022 | 9:46 AM

मुंबईः दहीहंडी दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदांची किंमत शिंदे-भाजप सरकार पैशांत करणार का? सरकारची ही असंवेदनशीलता असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात ट्विट करत आगपाखड केली आहे. राज्यात दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मोठ्या उत्साहात दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच दहिहंडीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण देणार असल्याची घोषणा केली. काही तांत्रिक अडचणींमुळे एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील विलेपार्ले येथील संदेश दळवी या गोविंदाचा सोमवारी मृत्यू झाला. त्यानंतर दळवी याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र मृत्युमुखी पडलेल्या गोविंदाच्या जीवाची किंमत हे सरकार पैशांत करण्याएवढं असंवेदनशील आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांचं ट्विट काय?

सोमवारी विलेपार्ले येथील संदेश दळवीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर राज्यातील जनतेत हळहळ व्यक्त झाली. त्याला आर्थिक मदत मिळणार असल्याच्या वृत्तानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केले. एका तरुणाच्या आयुष्याची किंमत ही पैशांमध्ये मोजून सरकारने असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे, असे ट्विट दानवेंनी केलंय.

जितेंद्र आव्हाडांचं ट्विट काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील संदेश दळवीच्या दुःखद मृत्यूनंतर ट्विट केले. दळवी कुटुंबियाच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार सहभागी आहे, असे म्हणत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संदेश दळवीचा मृत्यू कसा?

संदेश दळवी हा 22 वर्षांचा तरुण विलेपार्ले ईस्ट येथील शिवशंभो गोविंदा पथकात शामील होता. हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले येथील बावनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते. यावेळी दहीहंडीच्या सातव्या थरावरून कोसळून संदेश जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संदेश हा मूळचा विलेपार्ले इथला होता. काही दिवसांपूर्वीच त्याचं कुटुंब कुर्ला येथे स्थायिक झालं आहे. रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात अॅडमिट केलं होतं. त्याच्या डोक्याची शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी राज्य सरकारतर्फे 7.5 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली होती.  मात्र त्याची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. संदेशचा रुग्णालयातील एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. सोमवारी त्याचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या राज्यावर शोककळा पसरली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह प्रवीण दरेकर आदींनी संदेशच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं.