कसं का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालोच ना : अजित पवार

| Updated on: Jan 18, 2020 | 6:40 PM

आम्ही पण चार चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) म्हणाले.

कसं का होईना चार वेळा उपमुख्यमंत्री झालोच ना : अजित पवार
Follow us on

पुणे : आम्ही पण चार चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) म्हणाले. आज (18 जानेवारी) बारामतीतील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान त्यांनी गेल्या काही काळातील राजकीय नाट्याचा उलगडा केला आणि बारामतीकरांना मनमुराद (Deputy CM Ajit Pawar) हसवलं.

“आम्ही पण चार चार वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवले. कसं का असेना पण चार वेळेस मी उपमुख्यमंत्री झालो ना, माझ्या पध्दतीने झालो असेल. पण गंमतीचा भाग जाऊ द्या, म्हटलं, साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते, चला आपण पण चार वेळा उपमुख्यमंत्री झालो”, असं म्हणून अजित पवारांनी काही वेळ पॉझ घेतला आणि उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला.

आज बारामतीतील बाजार समीतीच्या रयत भवनमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते माळेगाव कारखान्याला केलेल्या मदतीबद्दल सांगत होते. “जर माळेगाव कारखान्याने जिल्हा बँकेऐवजी इतर बँक निवडली असती तर अधिकचे व्याज भरावे लागले असते आणि त्याचा भुर्दंड साहजिकच सभासदांवर आला असता, म्हणूनच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मी संबंधितांना फोन करून तजवीज केली. वास्तविक पाहता राज्यात जे सरकार होते, ते लोकांनी निवडून दिले होते. त्यांच्याकडे सहकारमंत्रीपद होते. मात्र त्यांनी राजकारण केले”, असं अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार हे नेहमीच आपल्या भाषणात गावरान भाषेचा वापर करत असतात. त्यातून त्यांचं ग्रामीण भागाशी असलेलं नातंही दिसून येतं. त्यामुळंच आजही होम पीचवर बोलताना अजितदादांनी दिलखुलासपणे विनोदी शैलीत भाषण करत उपस्थितांमध्ये हास्य पिकवलं.

दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहेत. तर नुकतेच काहि महिन्यांपूर्वी त्यांनी बंड करत भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अशा प्रकारे अजित पवार यांनी चार वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे.