पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनून दिल्लीत जाणार का?; देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास प्रतिक्रिया काय?

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्षावरुन विविध चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनून दिल्लीत जाणार का?; देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास प्रतिक्रिया काय?
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 06, 2024 | 1:43 PM

Devendra Fadnavis Reaction on BJP National President : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील भाजपचे प्रमुख नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात लवकरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे बोललं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्षावरुन विविध चर्चा रंगल्या आहेत. आता स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “जर मला दिल्लीत जायला सांगितलं, तर मी नक्कीच दिल्लीत जाईन”, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

“पार्टीने सांगितलं तर नक्की जाईन”

“नागपूरमधून निवडून येऊ देणार नाही असं म्हणत आहेत. तर दिल्लीत काय पाठवणार. माझ्या पक्षात आपला निर्णय आपण करत नाही. आपला निर्णय पार्टी करते. पार्टीने दिल्लीत जायला सांगितलं तर दिल्लीत जायचं. घरी जायला सांगितलं तर घरी जायचं. हे स्पष्ट आहे. आता जी राजकीय परिस्थिती दिसते. माझ्या पक्षाला मी ओळखतो त्या आधारावर सांगतो, माझा पक्ष मला महाराष्ट्रात ठेवेल. बातम्या काही येतात. त्या येतच राहतील. पत्रकारांना काही बातमी येत नाही. वेळ काढायचा असेल तर फडणवीस दिल्लीत जाणार अशा बातम्या येतात”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

“विरोधकांना जेवताना, उठताना झोपतानाही मी दिसतो”

यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “हिंदी म्हणतात मै अपने आपको गौरवान्वित महसूस करता हूँ, अशी माझी स्थिती आहे. मी त्यांना जेवताना, उठताना झोपतानाही मी दिसतो. त्यांना माझ्याशिवाय काही दिसत नाही. त्यांना ठरवलंय फडणवीस यांना टार्गेट करायचं”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“त्यांनी काही केलं तरी राज्यातील जनतेला माहीत आहे, माझी इमेज काय आहे. त्यांनी कितीही दुषण दिली तरी काही मते काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना माझ्यावर रोज आरोप करून विकासाचे मुद्दे बाजूला सारायचे आहे. ते मला किती मोठा नेता मानतात हे त्यातून स्पष्ट होतं”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.