पहाटेचा शपथविधी; जयंत पाटील याचं ‘ते’ वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात आले असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यावर प्रतिक्रिया विचारली.

पहाटेचा शपथविधी; जयंत पाटील याचं ते वक्तव्य, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया काय?
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: social media
| Updated on: Jan 26, 2023 | 6:35 PM

मुंबईः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोघांच्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचाच हात होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जयंत पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्यानंतर आज खुलासा केला. मला असं म्हणायचं नव्हतं, पण ज्या राजकीय घडामोडी घडल्या, त्यासाठी हेदेखील कारण असू शकतं, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर बोलणं टाळलं..

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात आले असताना माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यावर प्रतिक्रिया विचारली. मात्र आज प्रजासत्ताक दिन असल्याने कोणतंही राजकीय वक्तव्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

जयंत पाटील काल काय म्हणाले?

जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काल एक खळबळजनक वक्तव्य केलं. ते म्हणाले, ‘ 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. परंतु अल्पावधीतच हे सरकार कोसळलं.

अजित पवार हे त्यावेळी भाजपच्या खेळीला भुलले असतील, असं वाटत नाही. तेव्हा राष्ट्रपती राजवट होती. ती उठण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली ती खेळी असू शकते, असं वक्त्वय जयंत पाटील यांनी केलं. त्यामुळे त्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार होते का, अशी चर्चा राजकारणात सुरु आहे.

जयंत पाटील यांचा आजचा खुलासा काय?

या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी आज खुलासा केला. ते म्हणाले, ‘ माझा फक्त कयास आहे. त्या घटनेने हे घडलं असेल. पवार साहेब आम्हाला विचारून कधी पावलं टाकत नाहीत. आम्ही खूप ज्युनियर आहोत. तशी अपेक्षाही नाही.

पण त्यांनी एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीचा अर्थ कळण्यास बराच वेळ लागतो.
पण त्या वेळचा घटनाक्रम बघितला तर त्याचा फायदा नवं सरकार लवकर येण्यास झाला. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणूनबुजून केलं, असं मी अजिबात बोललो नाही. पण त्या शपथविधीचे फायदे काय झाले, हे मी समजावून सांगत होतो, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय.