
Devendra Fadnavis : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
“मला या गोष्टीचे फार दु:ख आहे. जेव्हा शत्रू आपल्यावर हल्ला करतो, पहलगामसारखा हल्ला केला जातो, तेव्हा भारतीय पक्षांनी राजकारण केलेलं नाही. दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी बांगलादेश युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता. आज मात्र अल्पमतीने भूमिका घेतली जात आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
“भारतात युद्धसदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादी बाब असो, या देशातल्या राजकीय पक्षांनी कधीही पक्षाकडे पाहिलेलं नाही. बांगलादेशच्या युद्धाच्या काळात देशात पक्षा-पक्षांमध्ये टोकाची लढाई चालू होती. पण वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना समर्थन दिले होते. हीच भारताची परंपरा राहिलेली आहे. पण अशाही परिस्थितीत विरोध करणं, उपहास करणं, मुर्खासारखी विधानं करणं हे जे चाललंय, त्याला देशाची जनता माफ करणार नाही,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी ठाकरे गटावर केला.
दिल्लीमध्ये पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या बैठकीचे निमंत्रण ठाकरे गटाला देण्यात आले होते. मात्र संसदेतील ठाकरे गटाचे फ्लोअर लिडर अरविंद सावंत यांनी सरकारला एक पत्र लिहून काही अपरिहार्य कारणामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही, असे कळवले होते. तसेच अशा कठीण परिस्थितीत आमचा पक्ष सरकारसोबत पूर्ण ताकदीने उभा आहे, असेही ठाकरे गटाने केंद्र सरकारला आश्वस्त केले होते.
दरम्यान, राज्य सरकारकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रायीन नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष विमानाने या नागरिकांना महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यासाठी काही हेल्पलाईन्सही सरकारने जारी काेलेल्या आहेत.