अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री

| Updated on: Oct 29, 2019 | 1:14 PM

आमच्या अधिकृत आणि अनधिकृत बैठका सुरु आहेत. पण निवडणुकांपूर्वी कधीच शिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नव्हता, असं देवेंद्र फडणवीस अनौपचारिक गप्पांदरम्यान म्हणाले.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच अडचणीत आणलं आहे. ‘मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार’ असा इशाराच जणू मिस्टर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला आहे. ‘वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असं वाटू शकतं’, असा टोमणाही फडणवीसांनी लगावला. दिवाळीनिमित्त पत्रकारांसोबत रंगलेल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनेक ‘बॉम्ब’ फोडल्याने शिवसेनेला कानठळ्या बसणार आहेत.

विधानसभा निवडणुका चांगल्या पार पडल्या. निवडणुकीत महायुतीला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही लवकरच सरकार स्थापन करु. मात्र काहीही बातम्या आल्या तरी सरकार आमचंच असेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. फडणवीस सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त लवकरच कळेल. शक्यतो पुढच्या आठवड्यात शपथविधी पार पडेल, असे संकेतही फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान दिले.

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस

आमच्या अधिकृत आणि अनधिकृत बैठका सुरु आहेत. पण निवडणुकांपूर्वी कधीच अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नव्हता. वाटायला काय, त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्रिपद पाहिजे, असं वाटू शकतं. वाटू शकणं आणि होणं यात फरक आहे, असं म्हणत शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नाला फडणवीसांनी टाचणी टोचली आहे.

1995 चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. मीडियाला सरकार स्थापनेबाबत सरप्राईज देणार, असंही फडणवीस मिश्किलपणे म्हणाले. आतमध्ये काय आहे, हे तुम्हाला माहीत नाही. पण लवकरच फॉर्म्युला कळेल. आमचा ‘ए’ प्लॅनच आहे, बी प्लॅनची गरजच नाही, असंही फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) म्हणाले.

भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘पंतप्रधानांनी स्पष्ट केलंच आहे, मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत विधीमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला. ‘फर्स्ट क्लास फर्स्ट’ आलो आहोत, पण आमच्या मेरिटबद्दल कोणीच बोलत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. साताऱ्यातील सभेत शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्यानंतर लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support  Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. भाजपच्या गळाला आतापर्यंत आठ अपक्ष उमेदवार लागले असून शिवसेनेनेही पाच जणांचा पाठिंबा मिळवत संख्याबळ वाढवलं आहे.