चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर देवेंद्र फडणवीस म्हणाले….

| Updated on: Feb 27, 2021 | 6:02 PM

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे शुक्रवारी (26 फेब्रुवारी) सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या फोटोत चित्रा वाघ आणि वनमंत्री संजय राठोड एकत्र दिसत आहेत (Devendra Fadnavis on Chitra Wagh morph photo).

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर देवेंद्र फडणवीस म्हणाले....
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणावरुन भाजप प्रचंड आक्रमक झालेलं बघायला मिळत आहे. भाजपच्या महिला आघाडीकडून आज राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे शुक्रवारी (26 फेब्रुवारी) सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या फोटोत चित्रा वाघ आणि वनमंत्री संजय राठोड एकत्र दिसत आहेत. या फोटोवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली (Devendra Fadnavis on Chitra Wagh morph photo).

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला (Devendra Fadnavis on Chitra Wagh morph photo).

“सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे”, असं फडणवीस ट्विटरवर म्हणाले.

“राज्यात ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या सातत्याने वाढत असलेल्या घटना, पूजा चव्हाण या भगिनीला न्याय मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला”, असंदेखील फडणवीस म्हणाले.

मॉर्फ केलेल्या फोटोवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया काय?

“माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करुन तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचंय? मिनिटामिनिटाला फोन करुन मला त्रास दिला जातोय. मला काम करता येत नाहीय. या संदर्भात सर्व सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचं काय कारण आहे?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. त्याचबरोबर “तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. पण जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्याचा फोटो मॉर्फ करणाऱ्यांना उत्तर दिलं.

“तुम्ही मला कितीही त्रास दिला, माझे आणखी काही फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले, कुणाचीही तोंडं फोटोला चिपकवली तरी मला काहीच फरक पडत नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे”, असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.