Eknath Shinde : मुलगा खासदार, स्वत:कडेही तगडी खाती, मग नाराज का आहेत एकनाथ शिंदे? ही 5 कारणे

| Updated on: Jun 21, 2022 | 9:33 AM

Eknath Shinde : शिंदेंच्या नाराजीमुळे राजकीय भूकंप येण्याचाही तर्क लढवला जातो.

Eknath Shinde : मुलगा खासदार, स्वत:कडेही तगडी खाती, मग नाराज का आहेत एकनाथ शिंदे? ही 5 कारणे
का आहे शिंदे नाराज?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे (Shiv sena politics) ठाण्याचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Eletion Result) निकालापासून ते नॉट रिचेबल होते. गुजरातमध्ये एकनाथ शिंदे असल्याचं पुढे आलं. दरम्यान, ते नाराज असल्याने पुढे काय राजकीय निर्णय घेतात? एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे राजकीय भूकंप येण्याचाही तर्क लढवला जातो. ठाण्यात शिवसेनेची कमान सांभाळलेल्या एकनाथ शिंदेच्या नाराजीची कारणं काय? नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं असलेल्या एकनाथ शिंदेची खदखद नेमकी का आहे? मुलगा खासदार आहे, स्वतःकडेही तगडी खाती आहेत, असं असताना शिंदे नाराज होण्याची नेमकी पाच महत्त्वाची कारणं कोणती हे जाणून घेऊयात…

हे सुद्धा वाचा

काय आहे पाच कारणं?

  1. आघाडीच्या राजकारणात घुसमट : सराकरमधील तीन पक्षांत चढाओढ असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालंय. अंतर्गत घुसमट वाढत गेल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाल्याचंही बोललं जातंय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या राजकारणतली घुसमट वाढल्यानं एकनाथ शिंदे टोकाचा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या मुलाला शिवसेनेनं खासदारकीही दिली. मात्र असं असतानाही इतर दोन पक्षांसोबत सरकार चालवताना राजकीय घुसमट होत असल्यानं गेले बरेच दिवस एकनाथ शिंदे बरेच दिवस अस्वस्थ होते, असं सांगितलं जातंय. अनेकदा त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचंही सूत्रांनी म्हटलंय. राज्यसभेचा निकाल, विधान परिषद निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर आता येऊ घातलेल्या सगळ्या महत्त्वपूर्ण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेची खदखद वाढल्याचंही सांगितलं जातंय.
  2. मुख्यमंत्रीपदाची आस? : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची आस आहे का, अशीही एक शंका घेतली जाते. 2019 च्या निकालानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, अशी चर्चा होती. भाजपसोबत युती सरकारची खलबतं सुरु असताना एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होतं. मात्र युतीची बोलणी फिस्कटली. अखेर उद्धव ठाकरे यांच्या नावावरच तिन्ही पक्षांनी पसंती दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची आस लागलीये का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
  3. उद्धव ठाकरेंसोबत स्पर्धा? : शिवसेनेतला एक मोठा वर्ग एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृ्त्त्व म्हणून पाहतो. असं असलं तरीही एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या पुढे जाण्यावर मर्यादा येतात, असंही राजकीय जाणकार सांगतात. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला असलेली किंमत गेल्या काही काळात कशी बदलत गेली, याचाही परिणाम एकनाथ शिंदेच्या वाढत्या नाराजीवर झाल्याचं बोललं जातं. त्यामुळे थेट उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे यांची स्पर्धा आहे की काय? अशीही चर्चा रंगलीय.
  4. शिवसेनेत डावललं गेल्याचा राग? : एकनाथ शिंदे आणि समर्थक यांच्यातील नाराजीचं आणखी एक कारणं सांगितलं जातं, ते म्हणजे पक्षातूनच डाववलं गेल्याचच. ठाण्यावर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व जरी असलं, तरीही शिवसेनेत मात्र त्यांना डावललं गेल्याचा आरोपही केला जातो. एकनाथ शिंदेची क्षमता ओळखूनही त्यांनी शोभेल अशी जबाबदारी शिवसेनेच्या पक्ष नेतृत्त्वाकडू देण्यात आली नाही, असंही सांगितलं जातं. शिवसेनेकडून सातत्यानं डावललं गेल्यानं त्यांची नाराजी वाढल्याचंही बोललं जातं. शिवसेनेचे आनंद दिघे यांचेय खंदे समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे दगाफटका झाला, तर शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल.
  5. फडणवीसांशी सलोख्याचे संबंध : भाजपसोबत असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध होते. ते आजही कायम आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर खुद्द शरद पवार यांनी फडणवीसांचं एका गोष्टीवरुन विशेष कौतुक केलं. वेगवेगळ्या मार्गानं माणसं आपलीशी करण्यात फडणवीस माहीर आहे, अशा आशयाचं विधान शरद पवार यांनी केलेलं होतं. दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर महत्त्वाचं विधान केलं होतं. सत्तेतील फुटलेल्या मतांबद्दल आपल्याला माहिती आहे, असं सूचक विधानही फडणवीसांनी केलेलं होतं. शिवसेनेची मतं विधान परिषद निवडणुकीत फुटल्यामागे नेमकं कोण होतं? यावरुनही चर्चांना उधाण आलेलं आहेच. तर दुसरीकडे शिवसेनेत गद्दार कुणीही नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधी व्यक्त केला होता. तर एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या वेळी मतदान करुन झाल्यानंतर लगेचच विधान भवन परिसरात निघून गेले होते. या सगळ्या वक्तव्यांचा आणि घडामोडींचाही आता एकमेकांशी संबंध लावला जातोय. तसंच ईडी, सीबीआयच्या धाडींचा धसका त्यांनी घेतला आहे की काय? अशीही शंका घेतली जातेय.

वाचा एकनाथ शिंदेच्या नाराजीबाबतचे सर्व लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा एकनाथ शिंदे लाईव्ह