‘एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यावर भर, परीक्षा आयोजनाच्या दृष्टीने उच्चस्तरीय समितीशी मुख्यमंत्र्यांची चर्चा…

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते.

‘एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यावर भर, परीक्षा आयोजनाच्या दृष्टीने उच्चस्तरीय समितीशी मुख्यमंत्र्यांची चर्चा...
devenrda fadanvis
| Updated on: Nov 23, 2026 | 7:14 PM

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती सिंघल आदी उपस्थित होते.

Loading...

एनटीएमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील परीक्षांसाठी राज्यातील उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करणे, प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक परीक्षा केंद्रांची उपलब्धता, परीक्षा केंद्रांवरील मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच परीक्षा आयोजनासाठी आवश्यक लॉजिस्टिक व्यवस्थापन या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन करताना राज्य शासन आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्रीय संस्थांमध्ये समन्वयाची प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने परीक्षा केंद्रांची उपलब्धता, केंद्रांवरील सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षित परीक्षा वातावरण निर्माण करण्यासाठी राज्याची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा यासाठी उपयोग करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

परीक्षा प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, इंग्रजी भाषेची अडचण असलेल्या तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ व्हावी, यासाठी आवश्यक बदल करण्यावर भर देण्यात आला. परीक्षांमधील विश्वासार्हता कायम राखताना गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षित आणि पारदर्शक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, अभ्यासक्रमाच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि स्पर्धात्मक आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि  प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, या बाबींचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

एनटीएच्या परीक्षा आयोजनासाठी केंद्र आणि राज्य यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी केंद्रित परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us