500 चौ. फुटांच्या घरांसाठी घेतलेले पैसे परत करा, मालमत्ता करमाफीच्या निर्णयानंतर खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक

| Updated on: Jan 03, 2022 | 12:23 AM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मालमत्ता करमाफीचा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे. तर भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर जोरदार टीकाही केली जात आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी 500 चौ. फुटांच्या घरांसाठी घेतलेले पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

500 चौ. फुटांच्या घरांसाठी घेतलेले पैसे परत करा, मालमत्ता करमाफीच्या निर्णयानंतर खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक
गोपाळ शेट्टी, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर (Property Tax) माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलाय. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात असलं तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे. तर भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर जोरदार टीकाही केली जात आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी 500 चौ. फुटांच्या घरांसाठी घेतलेले पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करु, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं निवडणूक जिंकली आणि शिवसेनेचा महापौर झाला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कायदा तयार करुन तो महापालिकेत पाठवण्यात आला. त्यानंतर महापालिकेनं त्याची अंमलबजावणी केली.

आमच्या पक्षाची सत्ता आल्यास… शेट्टींचं मोठं आश्वासन

या निर्णयानंतर पुढे कळाले की फक्त 20 टक्के कर कमी केला जात आहे. त्यावेळी मतदारांनी सांगितलं की आमचा विश्वासघात झाला. त्यावेळी मी फडणवीसांना पत्र लिहून दुरुस्त करण्यास सांगितलं होतं, असं शोट्टी म्हणाले. ज्या दिवसापासून हा कायदा लागू झाला त्या दिवसापासून लोकांकडून घेतलेले सर्व पैसे परत करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. इतकंच नाही तर ज्या दिवशी महानगरपालिकेत आमच्या पक्षाचं सरकार येईल, त्या दिवसापासून 2018 – 2019 मध्ये हा कायदा झाला, तेव्हापासून आम्ही सर्व पैसे परत करु, असं आश्वासनही शेट्टी यांनी दिलं आहे.

आशिष शेलारांचाही ठाकरेंवर निशाणा

आशिष शेलार यांनी सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यातबरोबर त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणीही केली आहे. आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत.

त्याचबरोबर ‘सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सुट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!’, अशी खोचक टीकाही शेलार यांनी शिवसेनेवर केलीय.

इतर बातम्या : 

धनूभाऊंचा पंकजाताईंना मेसेज! कोरोना पॉझिटिव्ह बहिणीचा धनुभाऊंना काय रिप्लाय?

Maharashtra Corona Update : मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; वर्षा गायकवाड घेणार नियोजनाचा आढावा