नागपूर जिल्ह्यात तिकीट द्यायचं कुणाला? गडकरी-मुख्यमंत्र्यांसमोर पेच

| Updated on: Sep 28, 2019 | 5:39 PM

हा पेच सोडवण्यासाठी या दोन्ही नेत्यांकडे (CM Fadnavis Nitin Gadkari) अवघे काही दिवस उरले आहेत. भाजपची दिल्लीत नुकतीच बैठक झाली, ज्याला नितीन गडकरीही उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात तिकीट द्यायचं कुणाला? गडकरी-मुख्यमंत्र्यांसमोर पेच
Follow us on

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात कुणाला तिकिटं द्यायची आणि कुणाचा पत्ता कट करायचा? हा सर्वात मोठा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (CM Fadnavis Nitin Gadkari) यांच्यापुढे निर्माण झालाय. हा पेच सोडवण्यासाठी या दोन्ही नेत्यांकडे (CM Fadnavis Nitin Gadkari) अवघे काही दिवस उरले आहेत. भाजपची दिल्लीत नुकतीच बैठक झाली, ज्याला नितीन गडकरीही उपस्थित होते.

नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी मुख्यमंत्र्यांचा दक्षिण-पश्चिम आणि पूर्व नागपूर मतदारसंघ सोडल्यास, सर्वच मतदारसंघात भाजपच्या इच्छुकांची मोठी यादी आहे. जिल्ह्यातील 10 जागांसाठी 100 पेक्षा जास्त भाजपचे इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची आणि कुठल्या कार्यकर्त्याचा पत्ता कट करायचा, त्यांची समजूत कशी काढायची, हाच सर्वात मोठा पेच मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर निर्माण झालाय.

लोकसभा निवडणुकीत पूर्व आणि दक्षिण – पश्चिम नागपूर मतदारसंघ सोडल्यास, चार मतदारसंघात भाजपची मतं कमी झाली. उत्तर नागपूर मतदारसंघात तर काँग्रेसने आघाडीही घेतली होती. शिवाय भाजपने केलेल्या सर्वेक्षणातही काही आमदारांचा आलेख घसरल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच नागपुरातील भाजपच्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरातील चार जागांसाठी भाजपचे तब्बल 80 च्या वर इच्छुक आहेत. त्यामुळेच तिकीट वाटप करताना भाजपच्या नेत्यांचा कस लागणार, हे मात्र नक्की.

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची 4 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळेच पुढच्या दोन-तीन दिवसांत भाजपला उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.