20 वर्षांपूर्वी पवारांनी काँग्रेस का सोडली होती?

| Updated on: May 30, 2019 | 6:08 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक वेगळे राजकीय प्रयोग होत आहेत. असाच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पवार यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामागे अनेक कारणेही सांगितली जात आहेत. 20 […]

20 वर्षांपूर्वी पवारांनी काँग्रेस का सोडली होती?
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकारणात अनेक वेगळे राजकीय प्रयोग होत आहेत. असाच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पवार यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामागे अनेक कारणेही सांगितली जात आहेत.

20 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहे म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले. यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचे निलंबन केले. काँग्रेसच्या निलंबनानंतर तात्काळ या तिघांनीही मे-जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी भारतीय समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्यात आले होते.

शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, खरे कारण शरद पवार यांची महत्वकांक्षा असल्याचेही त्यावेळी बोलले गेले. काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही, असे लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करुन सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित करण्यात पवारांचे सहकारी तारिक अन्वर हे त्यावेळी आघाडीवर होते, असेही बोलले जाते.

विशेष म्हणजे आजमितीस शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना करणाऱ्या पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या दोन्ही सदस्यांनी याआधीच राष्ट्रवादीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्या मुद्द्यावर झाली, पुढे त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्तेत भागीदारी केली. राज्यासह केंद्रातही राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला. स्वतः शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री होते.

काँग्रेसमधील राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांनी असा कोणताही निर्णय झाले नसल्याचे म्हणत हे वृत्त फेटाळले. राहुल गांधींसोबत झालेली बैठकीत महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात विश्लेषणात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच राज्यातील दुष्काळाबाबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्षपदाला दुसरा पर्याय दिसत नसल्याने राहुल गांधींनी राजीनामा देणे योग्य नाही, असेही पवारांनी यावेळी सांगितले.