मुंबई: शिवसेनेच्या फायर ब्रँड माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. म्हात्रे यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात (eknath shinde) प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय गणितं बदलली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातच नव्हे तर मुंबईतही शिवसेना (shivsena) कमकुवत झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीचं गणित नीट बसावं आणि महापालिकेतील प्रवेश सुकर व्हावा म्हणून शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे म्हात्रे यांच्या या बंडाला मोठं महत्त्वं आलं आहे. शीतल म्हात्रे यांच्या या बंडापुरतं. शिवसेनेचं फारसं नुकसान होणार नाही. झालं तर एका मतदारसंघापुरतं होईल, असं असलं तरी म्हात्रे यांच्या शिवसेना सोडण्याने महापालिकेतील गणितं मात्र बदलू शकतात, ते कसे? याचा घेतलेला हा आढावा.
त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो ?आज मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुंबई येथील नंदनवन या निवासस्थानी हा प्रवेश झाला. यावेळी मा. एकनाथ शिंदे साहेब यांना पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.@DrSEShinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/TqL2mdQIW1
— Prakash Surve – प्रकाश सुर्वे (@miprakashsurve) July 12, 2022
शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या दहिसर येथील नगरसेविका होत्या. त्या वॉर्ड क्रमांक 8 मधून शिवसेनेचं महापालिकेत प्रतिनिधीत्व करत होत्या. शीतल म्हात्रे यांची महापालिकेतील ही तिसरी टर्म आहे. या काळात त्यांनी विधी, आरोग्य, महिला व बालकल्याणसह महापालिकेच्या विविध समित्यांवर काम केलं आहे. त्या चांगल्या वक्ता आहेत. कुशल संघटक आहेत. त्या प्रश्नांची जाण असलेल्या अभ्यासू नगरसेविका आहेत. तसेच विभागात प्रचंड काम करणाऱ्या त्या मेहनती नगरसेविका म्हणूनही प्रसिद्ध आहे. मीडियासमोर पक्षाची भूमिका कशी मांडायची याचं त्यांना चांगलं भान आहे. या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू असून त्यामुळेच त्या दहिसरमध्ये नगरसेविका म्हणून लोकप्रिय आहेत.
शीतल म्हात्रे यांचा वॉर्ड खुला झाला आहे. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्यात शिवसेनेतून काही अडचण नव्हती. पण राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक अधिक कठीण जाणार आहे. म्हणूनच त्यांनी बंड केल्याचं सांगितलं जातं. दहिसर ते बोरिवली पट्ट्यात भाजपचं मोठं वर्चस्व आहे. या परिसरातून भाजपच्या आमदार मनिषा चौधरी, प्रवीण दरेकर, विनोद तावडे येतात. तसेच शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वेही याच परिसरातील आहेत. या पट्ट्यात गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्वांचा विचार करूनच शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
शीतल म्हात्रे या अभ्यासू आणि कार्यकुशल माजी नगरसेविका आहेत. . पालिकेतील शिवसेनेची भूमिका त्या सातत्याने मांडत होत्या. त्या मीडियातील चेहराही आहेत. मात्र, त्यांना काही मर्यादा आहेत. त्या लोकप्रिय माजी नगरसेविका आणि शिवसेना पदाधिकारी असल्या तरी मुंबईतील संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव पाडतील असं त्यांचं व्यक्तीमत्त्व नाही. त्या मुंबईत शिवसेनेचं प्रचंड नुकसान करतील असंही नाही. एवढंच काय संपूर्ण दहिसर परिसरातून शिवसेना हद्दपार करतील एवढंही त्यांची ताकद नाही. त्यांच्या शब्दाखातर शिवसेनेचे मुंबईतील पदाधिकारी, नगरसेवक फुटतील अशीही परिस्थिती नाही. त्यांचा प्रभाव केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याने शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही.
शीतल म्हात्रे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याने शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही हे खरं असलं तरी त्यांच्यामुळे शिवसेनेला एक मोठा फटका बसू शकतो. शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गळाला मुंबईतील काही आमदार लागले. पण मुंबईतील शिवसेनेचा एकही नगरसेवक फुटला नव्हता. शीतल म्हात्रे यांच्या रुपाने शिवसेनेतील हे नगरसेवकांचं हे पहिलं बंड झालं आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येही चलबिचल सुरू होईल. त्यांची भीती चेपेल आणि तेही निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे बंड करतील. त्याला कारणीभूत शीतल म्हात्रे यांचं बंड असेल, असं जाणकार सांगतात. तसेच ज्या नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात गेले आहेत, त्यांना शिवसेनेची तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे हे नगरसेवक शिंदे गटात जाऊन तिकीट मिळवून महापालिकेत येऊ शकतात. त्यामुळेही शिवसेनेत आगामी काळात नगरसेवकांचं बंड पाहायला मिळू शकतं, असंही जाणकार सांगतात.