BLOG : बारामतीच्या कुरुक्षेत्रावर अजित पवार अर्जुन ठरणार की, त्यांचा अभिमन्यू होणार?

| Updated on: Apr 26, 2024 | 11:00 AM

महाभारतातल्या घटना, प्रसंग आपण आजच्या काळातही अनुभवतो. महाभारतात मानवी स्वभावाचे जे पैलू दाखवले आहेत, ते आजच्या काळाशी सुसंगत आहेत. राजकारणाच्या मैदानात अनेकदा महाभारतासारखी स्थिती निर्माण होते. पात्र फक्त बदलेली असतात.

BLOG : बारामतीच्या कुरुक्षेत्रावर अजित पवार अर्जुन ठरणार की, त्यांचा अभिमन्यू होणार?
शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

महाभारतात भाऊच भावांविरुद्ध लढले होते. महाभारताच वैशिष्ट्य म्हणजे त्यात धर्मा बरोबर अधर्म, निती सोबत अनिती, निस्वार्थी भावनेसोबत स्वार्थी उद्देश, छळ, कपट, नैतिकता या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी महाभारताइतका उत्तम शिक्षक नाही. महाभारतातून बरच काही शिकण्यासारख आहे. महाभारताच सार बरच काही शिकवून जातं. आयुष्यात यश-अपयश पचवण्यासाठी महाभारत समजून घेतलं पाहिजे. महाभारतातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुनाची झालेली अवस्था. अंतिम युद्धाच्यावेळी समोर सगळे आपलेच होते. ज्यांनी शिकवलं-घडवलं, त्यांच्यावरच बाण चालवायचे होते. संवेदनशील मनाच्या अर्जुनाला आपल्याच माणसांना मारणं पटत नव्हतं. अर्जुनाच मन धनुष्य उचलायला धजावत नव्हतं, त्यावेळी त्याच्या रथाच सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्याला धर्म-अधर्मामधला फरक समजावून युद्धा लढण्यासाठी तयार केलं, त्यानंतर घडलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे.

महाभारतातल्या या घटना अनेकदा आपल्या व्यक्तीगत आयुष्यात सुद्धा घडतात. समोर आपलेच असतात. विषय फक्त वेगळे असतात. संपत्ती, पैसा, वर्चस्व, मान-सन्मान आणि राजकारण अशा विषयांवर संघर्ष असतो. राजकारणात बऱ्याचदा वारसा, वर्चस्वाच्या लढाईत आपसात यादवी होते. त्यावेळी सगळ्या नात्या-गोत्यांचा, आठवणींचा विसर पडतो. समोर दिसत असतो तो फक्त विजय, प्रतिष्ठा, वर्चस्व. ज्यांचा हात पकडून आपण राजकारणात आलोय, त्यांच्यामुळे ओळख मिळाली, नाव मिळालं, आपलं अस्तित्व निर्माण झालं, याचा सुद्धा विसर पडतो. डोळ्यासमोर, डोक्यात असतो, तो फक्त ‘मी आणि मी’ च.

मतदार राजा ठरवणार कोणाची बाजू नितीची

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी स्थिती आहे. काका-पुतणे आमने-सामने आहेत. पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. सगळ्या महाराष्ट्राच लक्ष या राजकीय लढाईकडे लागलं आहे. या लढाईच कुरुक्षेत्र बारामती असलं, तरी सामना अख्ख्या महाराष्ट्रात आहे. दोन्ही बाजूंसाठी लढाई अस्तित्वाची आहे. धर्म-अर्धम, नैतिकता-अनैतिकतेच्या या लढाई मतदार राजा कोणाची बाजू नितीची ते ठरवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. सुप्रिया ताई की, दादा? ते आता मतदारच ठरवतील.

अर्जुन ठरणार की अभिमन्यू

लढाई प्रतिष्ठेपेक्षा पण स्वतंत्र अस्तित्वाची असल्याने सर्वच योद्धे त्वेषाने, प्राणपणाने लढतील यात शंका नाही. या लढाईत अजित पवारांसमोर सुद्धा आपलेच आहेत. स्वत: अजित पवारांचा सख्खा भाऊ, पुतणे, भाचे सगळे मिळून अजित पवारांविरोधात प्रचार करतायत. अजित पवार आपलं सर्व कौशल्य पणाला लावतील यात अजिबात शंका नाही. आपल्या माणसांचे वार झेलून अजित पवारांना मतदार राजाला आपली बाजू पटवून द्यायची आहे. या लढाईत ते अर्जुन ठरणार की अभिमन्यू याचा फैसला 4 जूनला होईल.