संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे : बाळासाहेब थोरात

| Updated on: Oct 08, 2019 | 5:42 PM

काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी काँग्रेसची खिंड बाजी प्रभू देशपांडेंसारखी लढवणार, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

संकटकाळात मी काँग्रेसचा बाजीप्रभू देशपांडे : बाळासाहेब थोरात
Follow us on

अहमदनगर : काँग्रेस अडचणीत असताना अनेकजण सोडून गेले, पण मी काँग्रेसची खिंड बाजीप्रभू देशपांडेंसारखी (Baji Prabhu Deshpande) लढवणार, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला. ते नगरमध्ये बोलत होते. इतिहास तोच घडवतो जो सातत्याने लढत राहतो. पळून जाण्यात काय अर्थ असा टोलाही थोरात (Balasaheb Thorat) यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला.

संगमनेर तालुक्यातील निर्झणेश्वर महादेव मंदिरात नारळ फोडून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे, बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे तसेच नगर जिल्हयातील काँग्रेसचे तीनही उमेदवार उपस्थित होते.

मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून दररोज 18 तास काम करत आहे. पडझडीच्या काळात राज्यातील मोठी जबाबदारी माझ्यावर आली आहे. बडे बडे जरी सोडून गेले तरी नविन कार्यकर्ते बडे होत आहेत. एवढ्या कठीण काळात कशाला अध्यक्षपद घेतलं असं अनेकजण म्हणत होते. पण इतिहास त्यांचाच होतो जो संकटाच्या काळात उभा राहतो.घर पेटलं तर तुम्ही पळून जाणे योग्य नाही, अशी खोचक टीका बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर नाव न घेता केली.

या निवडणुकीत काँग्रेस नव्या जोमाने उभारी घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आज जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती 1999 साली काँग्रेसची झाली होती. मात्र तेव्हाही मी तत्व सोडून कधीही पक्ष सोडला नाही.पुढील काळात यश हे आपलं आहे असं थोरात म्हणाले.

सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारी माणसे महाराष्ट्रात आहेत. पक्षाध्यक्ष कुठे दिसत नाही म्हणणारे साडेचार वर्षे विरोधी पक्षनेते होते का? कारण विरोध करताना ते कुठे दिसलेच नाहीत, अशी टीकाही थोरातांनी विखेंवर केली.

शिवसेना भाजप हे अपयशी सरकार ठरलं आहे. खोटी कर्जमाफी, विम्याचा लाभ खासगी कंपन्यांना, उद्योग बेरोजगारी आणि शेतकरी असे गंभीर प्रश्न राज्याला सतावत आहेत. मूलभूत प्रश्नावर सरकारकडे उत्तर नाही, असंही थोरात म्हणाले.