रायगडमध्ये ‘अनंत गीतें’विरोधात ‘अनंत गीते’च, तटकरेंची खेळी की योगायोग?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

अलिबाग (रायगड) : रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीतील संभ्रमाबाबत 2014 सालची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. 2014 साली सुनील तटकरे नावाचा आणखी एक अपक्ष उमेदवार उभा राहिल्याने, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना फटका बसला होता. या निवडणुकीतही अशीच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यावेळी तटकरेंच्या नावाचा अपक्ष उमेदवार नसून, सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाचा […]

रायगडमध्ये अनंत गीतेंविरोधात अनंत गीतेच, तटकरेंची खेळी की योगायोग?
Follow us on

अलिबाग (रायगड) : रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारीतील संभ्रमाबाबत 2014 सालची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. 2014 साली सुनील तटकरे नावाचा आणखी एक अपक्ष उमेदवार उभा राहिल्याने, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना फटका बसला होता. या निवडणुकीतही अशीच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यावेळी तटकरेंच्या नावाचा अपक्ष उमेदवार नसून, सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावाचा आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपकडून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनंत गीते यांच्यासमोर सुनील तटकरे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याचं आव्हान आहेच. मात्र, आणखी एक गोची गीतेंसमोर निर्माण झाली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून ‘अनंत गीते’ नामक अपक्ष उमेदवारानेही अर्ज भरला आहे. अनंत पद्मा गीते असे या अपक्ष उमेदवाराचे संपूर्ण नाव आहे. या अपक्ष ‘अनंत गीतें’चा फटका शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना बसण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी ‘सुनील तटकरे’ नामक अपक्ष उमेदवार रायगड लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरला होता. त्या उमेदवाराचा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना थेट फटका बसला होता. गेल्यावेळी सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या मतांमध्ये केवळ दोन हजार मतांचा फरक होता. म्हणजेच, अगदीच निसटता पराभव सुनील तटकरेंना स्वीकारावा लागला होता. विशेष म्हणजे, याच निवडणुकीत ‘सुनील तटकरे’ या अपक्ष उमेदवाराला मात्र 9 हजार 849 मतं मिळाली होती.

गेल्यावेळचं मतांचं गणित पाहता यंदा शिवसेनेचे मंत्री अनंत गीते यांच्यासमोरील आव्हान दुपटीने वाढलं आहे. एकीकडे बलाढ्य असे सुनील तटकरे, तर दुसरीकडे संभ्रमाची स्थिती निर्माण करणारा ‘अनंत पद्मा गीते’ हा अपक्ष उमेदवार आहे.

अनंत गीते या नावाचाच उमेदवार रायगडमधून उभा राहिल्याने, ही सुनील तटकरेंची राजकीय खेळी आहे की निव्वळ योगायोग आहे, याची चर्चा आता रायगडमध्ये रंगू लागली आहे.