अमित शांहांचं ते भाषण, जे ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही पाठ थोपटली

| Updated on: Aug 05, 2019 | 8:38 PM

या विधेयकाला विरोध करणाऱ्या सर्व नेत्यांच्या प्रश्नाला गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तरं दिली. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं नाव घेऊन त्यांना इतिहासातील काही गोष्टींची आठवणही अमित शाहांनी करुन दिली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमित शाहांना शाबासकी दिली.

अमित शांहांचं ते भाषण, जे ऐकल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही पाठ थोपटली
Follow us on

नवी दिल्ली : राज्यसभेने जम्मू काश्मीर पुनर्गठन (Jammu and Kashmir Reorganisation Bill, 2019) विधेयक मंजूर केलंय. राज्यसभेत 125 विरुद्ध 61 मतांनी हे विधेयक मंजूर झालं, तर एका सदस्याची अनुपस्थिती होती. या विधेयकात (Jammu and Kashmir Reorganisation Bill, 2019) जम्मू काश्मीरला वेगळं करुन लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलाय. या विधेयकाला विरोध करणाऱ्या सर्व नेत्यांच्या प्रश्नाला गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तरं दिली. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं नाव घेऊन त्यांना इतिहासातील काही गोष्टींची आठवणही अमित शाहांनी करुन दिली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमित शाहांना शाबासकी दिली.

अमित शाहांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

2009 मध्ये संसदेने देशातील सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला, पण हा अधिकार जम्मू काश्मीरमधील मुलांना नव्हता. आता हा देखील अधिकार त्यांना मिळेल.

देशातली कोणतीही व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक करु शकत नाही. कारण तिथे संपत्तीच खरेदी करता येत नाही. आता संपत्तीही खरेदी करता येईल आणि गुंतवणूक होऊन रोजगार मिळेल.

संसदेत मंजूर झालेल्या विधेयकाचा फायदा संपूर्ण देशात होत होता, पण जम्मू काश्मीरला त्याचा फायदा होत नव्हता. आता जम्मू काश्मीरलाही न्याय मिळेल.

गुलाम नबी आझाद म्हणतात, की जम्मू काश्मीरमध्ये आता आंतरराज्य लग्नही होत आहेत. पण जम्मू काश्मीरच्या मुलींनी बाहेरच्या मुलाशी विवाह केल्यानंतर तिचा संपत्तीवर हक्क संपुष्टात येत होता. आता जम्मू काश्मीरच्या मुलींचा मुलभूत हक्क हिरावला जाणार नाही.

जम्मू काश्मीरमधील अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय समाजाला आजपर्यंत आरक्षणाचा कोणताही लाभ का मिळाला नाही? आता सर्व समुदायाला आरक्षणाचा लाभ मिळेल.

दहशतवादाची वाढ जम्मू काश्मीरमध्येच झाली. काश्मिरी तरुणांमध्ये तेथील नेत्यांनी गैरसमज निर्माण केला. आतापर्यंत 41 हजार 400 लोकांनी जीव गमावलाय. हे सर्व कुणाच्या धोरणामुळे झालं? 1988 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल जिया म्हणाले होते, की जोपर्यंत कलम 370 आहे, तोपर्यंत काश्मिरी तरुण भारताच्या आत्म्याशी जोडले जाऊ शकत नाहीत. इतर राज्यांमधील तरुण भ्रमित होत नाही. कारण, तिथे फुटीरतावादी नाहीत.

पंडित जवाहरलाल नेहरुंनी सांगितलं होतं की, कलम 370 ची झीज होऊन ते संपुष्टात येईल. पण हे (काँग्रेस) म्हणतात की, सरदार पटेल यांनी कलम 370 आणलं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. सरदार पटेल यांनी भारत अखंड ठेवला. सरदार पटेल यांनी काश्मीर प्रश्न हाताळला नाही. त्यांनी जुनागड आणि हैदराबाद प्रश्न हाताळला, जो आज भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर प्रश्न नेहरुंनी हाताळला.

स्वातंत्र्यानंतर देशात अनेक राज्यांचं विभाजन झालं. भाजपनेही केलं आणि काँग्रेसनेही केलं. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या विभाजनाचं चित्र सर्वांना माहित असेल. प्रसारण बंद केलं होतं आणि रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया चालली होती.

जम्मू काश्मीरचे लोक 70 वर्ष कलम 370 सोबत जगले. आता आम्हाला पाच वर्ष द्या. जम्मू काश्मीरला आम्ही देशातील सर्वात विकसित राज्य बनवू.

जम्मू काश्मीरच्या अंतिम समस्येचं समाधान शोधण्यासाठी हाच (कलम 370 काढणे) योग्य मार्ग आहे.

सर्वांना विनंती आहे की आपण मतांचं राजकारण सोडावं. त्याशिवाय काश्मीर प्रश्न सुटणार नाही. काश्मीरच्या जनतेला आपल्याला वास्तव सांगावं लागले. आप, बसपा, एआयएडीएमके, बीजेडी या सर्व पक्षांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो.

जेव्हा आम्ही नगरपालिकेतही जिंकत नव्हतो, तेव्हापासून आमच्या जाहीरनाम्यात कलम 370 च्या मुद्द्याचा समावेश आहे. कारण, कलम 370 चुकीचं आहे. आज तर आम्हाला 2014 आणि 2019 मध्येही जनतेने बहुमत दिलंय.

VIDEO : अमित शाहांचं संपूर्ण भाषण